सातारा : ‘गाव तिथं एसटी’ अन् ‘प्रवाशी हेच दैवत’ हे ब्रीदवाक्य घेऊन उत्पन्नापेक्षा प्रवाशांच्या सेवेला महत्व देऊन एसटीने सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कड्या-कपाऱ्यांतील दुर्गम वाड्या वस्त्या, जावळी खोऱ्यातील गावागावत जाळं विणलं आहे. पण कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये अजूनही बंद असल्याने हक्काचे प्रवासी घरात आहेत. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटीने उत्पन्न मिळविण्यासाठी पुणे, मुंबई आदी मोठ्या शहरांमध्ये धाव घेतली आहे.
एसटीचे मुख्य उत्पन्नाचे साधन हे विद्यार्थी वाहतूक आहे. कोरोनापूर्वी विद्यार्थ्यांची गरज भागविताना एसटीची दमछाक होत होती. मात्र आता सर्वच विद्यार्थी घरात बसून आहेत. त्यातच कोरोनाचा धोका असल्याने लोक शहरात जाण्यास धजावत नाहीत.
चौकट
शहरात येण्यासाठी ‘टमटम’ किंवा खासगी वाहने
सातारा तसेच प्रमुख शहरात ग्रामीण भागातून येण्यासाठी एसटी नसल्याने टमटम किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मिळेल त्या गाड्यांना हात करुन थांबविले जाते. यामध्ये अनेकदा ट्रक, टॅँकरचाही समावेश असतो.
कोट
सातारा आगारातून सध्या राज्यातील प्रमुख शहरात वाहतूक सुरू असली तरी सोमवार, दि. १९ पासून तालुक्यातील ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे होणारी गैरसोय दूर होणार आहे.
- रेश्मा गाडेकर
आगार व्यवस्थापक, सातारा.
सातारा तालुक्यातील धावडशीला पूर्वी सकाळी सहापासून दहापर्यंत एसटी यायची. मात्र आता एकही गाडी येत नसल्याने साताऱ्याला येण्यासाठी मिळेल त्या वाहनाला हात करण्याची वेळ आमच्यावर येत आहे.
- सागर पवार, प्रवासी.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरुन दररोज शेकडो लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. पण त्या साताऱ्यातील पंधरा वीस किलोमीटर अंतरातील लहान गावांमध्ये राहत नाहीत. त्यावर उपाय निघणे गरजेचे आहे.
- स्वप्निल शिंगटे, प्रवासी
बावीस हजारांचा रोजचा प्रवास पण ग्रामीणशिवाय
सातारा आगारातून पुणे, मुंबई, बोरिवली आदी भागात एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत.
सातारा आगारातून दररोज सरासरी बावीस हजार किलोमीटरच्या फेऱ्या सुरू आहेत.
ग्रामीण प्रवाशांना याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे एसटी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.