औंध : कोरोनाच्या महामारीनंतर शाळा, महाविद्यालय सुरू झाली आहेत; परंतु परगावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जायचे कसे हा प्रश्न सतावत आहे. विद्यार्थी शाळेत येत असले तरी वेळेवर एसटी नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वारंवार मागणी करून देखील एसटी सुरू होत नसल्याने पालक आणि विद्यार्थी संतप्त झाले आहेत.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नववी ते बारावीचे वर्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. शाळा सुरू झाल्यामुळे पालकांनी देखील धाडसाने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले आहे. औंध येथे शिक्षणासाठी चोराडे, वडगांव, पुसेसावळी, गोरेगाव पारगाव, कळंबी, वडी, त्रिमली, नांदोशी उंचीठाणे, वरुड, सिद्धेश्वर कुरोली, गोपूज, जायगांव, लोणी, भोसरे, अंभेरी कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी, न्हावी बुद्रूक, सांगली जिल्ह्यातील रायगाव, हिंगणगाव, येडे उपाळे, आदी गावातून विद्यार्थी येत असतात. शाळा सुरू झाली मात्र शाळेत येण्या-जाण्यासाठी एसटी बसेस नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
औंध ग्रामपंचायत आणि औंध शिक्षण मंडळाने जिल्हा नियंत्रकांकडे लेखी पत्राद्वारे एसटी बसेस पूर्ववत कराव्यात अशी मागणी केली आहे. मात्र जिल्हा नियंत्रकांनी या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. वेळेवर बस नसल्याने शैक्षणिक वर्ष कसे पार पडणार या काळजीने पालक आणि विद्यार्थ्यांना ग्रासले आहे. आता फक्त माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय सुरू आहेत. येत्या १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये देखील सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्येचा भार आणखीनच वाढणार आहे.
(कोट)
औंधला बालवाडी ते महाविद्यालयीन आणि आयटीआय शिक्षणासाठी विद्यार्थी येत असतात. गावोगावचे सरपंच आणि पालकांची मागणी लक्षात घेऊन एसटी बसेस पूर्ववत सुरू कराव्यात अशी विनंती जिल्हा नियंत्रकांना केली आहे. एसटी बसेसअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
- हणमंतराव शिंदे, विश्वस्त, औंध शिक्षण मंडळ