इन्स्पायर अवार्ड मानक स्पर्धेत इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी ५० व माध्यमिक शाळांनी १५८ अशी एकूण २०८ उपकरणे निर्माण केली आहेत. यातील राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी दहा टक्के म्हणजेच एकूण उपकरणांपैकी २१ उपकरणांची निवड होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा जिल्हास्तरावर ऑनलाईन मूल्यमापन होऊन राज्यभरातून राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी दहा हजार उपकरणे निवडण्यात येणार आहेत, तर राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी देशभरातून केवळ एक हजार उपकरणे निवडण्यात येणार आहेत. त्यापैकी साठ उपकरणांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये पुरस्कार मूल्य जमा झाले आहे, असे इन्स्पायर अवार्ड मानकचे जिल्हा समन्वयक लक्ष्मण उबाळे यांनी सांगितले. जिल्ह्यातून जास्तीत जास्त व उत्कृष्ट उपकरणे वेळेत तयार करून घेण्यासाठी शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, शिक्षण विस्तार अधिकारी, विज्ञान पर्यवेक्षिका मंगल मोरे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याचबरोबर जिल्ह्याची वेळोवेळी माहिती देण्याचे काम आरती साळुंखे यांनी केले.
जिल्हा समन्वयक लक्ष्मण उबाळे यांनी जिल्ह्यातील निवड झालेली उपकरणे कशापद्धतीने ऑनलाईन अपलोडिंग करावी; तसेच ऑनलाईन माहिती भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी जिल्ह्यातील शिक्षकांना मार्गदर्शन केले. या कामासाठी त्यांना सचिन पंडित व संभाजी पाटील यांचे सहकार्य लाभले.