कऱ्हाड : ‘कऱ्हाड तालुक्यातील जास्तीत जास्त प्राथमिक शाळा ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, म्हणजे शाळा ‘आयएसओ’ मानांकन होतील,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.कऱ्हाड-पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक व उत्कृष्ट शाळांमधील शिक्षकांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार शंभूराज देसाई, आमदार आनंदराव पाटील, मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, नितीन जगताप, इंद्रजित चव्हाण, शाळा क्र. तीनचे मुख्याध्यापक अर्जुन कोळी, संचालक बाजीराव शेटे, उपाध्यक्ष शरद पवार, संचालक विकास देशमुख, राजेंद्र शेलार, सुनील पाटील आदी उपस्थित होते.आमदार चव्हाण म्हणाले, ‘कऱ्हाड पालिकेची शाळा क्र. तीन ही राज्यातील नगरपालिकेची पहिली ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त शाळा झाली आहे. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळा मानांकन प्राप्त झाल्या पाहिजेत. कऱ्हाड- पाटण शिक्षक सोसायटीचा कारभार पारदर्शकपणे सुरू आहे. शिक्षक सोसायटीने स्पर्धेला सामोरे जाताना शिक्षकांच्या मुलांसाठी यूपीएससी व एमपीएससीचे वर्ग सुरू करावेत.’ ‘प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिल्यास समाजाने गुणवत्तेची अपेक्षा धरू नये. त्यांची अशैक्षणिक कामे कमी करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू,’ असे मत आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक, उत्कृष्ट शाळा, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अंकुश नांगरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
तालुक्यातील शाळा ‘आयएसओ’ होण्यासाठी पुढाकार घ्यावा
By admin | Published: October 21, 2015 9:45 PM