कऱ्हाड : अलीकडच्या काळात काही पैलवान इंजेक्शन घेऊन मोठे होतात; पण ते दीर्घकाळ टिकत नाहीत. त्याप्रमाणेच उत्पादन वाढीच्या नावाखाली रासायनिक खतांचा बेसुमार वापर करून वाढवलेली पिके सुद्धा आता फार काळ चालणार नाहीत. आम्हाला विषमुक्त शेतीचाच विचार करावा लागेल. पुन्हा एकदा शेतीचे विज्ञान नव्याने मांडावे लागेल असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.कऱ्हाड येथे दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या कृष्णा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माथाडीचे नेते नरेंद्र पाटील, डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्हा अध्यक्ष मनोज घोरपडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, विनायक भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, रामकृष्ण वेताळ, संग्राम बर्गे आदींची प्रमुख उपस्थिती होती.फडणवीस म्हणाले, या देशातले पहिले शास्त्रज्ञ हे शेतकरीच आहेत. त्यांनी गरजेनुसार वेगवेगळे प्रयोग केले, नवनवीन उत्पादने घेतली. पण अलीकडच्या काळात उत्पादकता वाढीच्या नावाखाली केमिकल खतांचा होणारा भरमसाठ वापर हा भविष्य काळात परवडणारा नाही. म्हणून आम्हाला नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा विचार करावा लागेल.आज प्रत्येक ठिकाणी क्षारपड जमिनीचे क्षेत्र वाढत चालले आहे. म्हणूनच खतांचा आणि पाण्याचा वापर कसा करायचा? ते समजून घेतले पाहिजे. पिकाला आवश्यक तेवढेच पाणी व खत दिले पाहिजे. आपल्याकडे कृषी क्षेत्रासाठी वातावरण पूरक आहे. पण आधुनिक शेती व्यवस्थापनामुळे ज्या देशात पाण्याचे प्रमाण कमी आहे ते देश शेतीमध्ये आपल्यापेक्षा अधिक प्रगत दिसतात. त्याचा आपल्यालाच विचार करावा लागेल. कृषी व उद्योग क्षेत्राने हातात हात घालून काम केल्याशिवाय शेतकऱ्यांची प्रगती नाही हे कृष्णा उद्योग समूहाने जाणले. म्हणूनच आज कृषी व औद्योगिक प्रदर्शन आकाराला आले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल असा आशावादही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविक व स्वागत डॉ. अतुल भोसले यांनी केले. आभार गजेंद्र पाटील यांनी मांनले.
शेतीतील विज्ञान आता नव्याने मांडावे लागेल - देवेंद्र फडणवीस
By दीपक शिंदे | Published: January 17, 2024 4:35 PM