कºहाड : धोंडेवाडी, ता. कºहाड गावच्या हद्दीतील बिबट्याच्या मादीचे दोन बछडे सापडल्याची घटना ताजी असताना पुन्हा येथील परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे उघडकीस आले आहे. येथील गडाळकी नावच्या शिवारातील वस्तीवर बांधलेल्या घोड्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या परिसरात गत आठवड्यात उसाच्या फडात दोन बिबट्यांचे मादी बछडे सापडले होते. त्या बछड्यांपैकी एकाचा मृत्यूही झाला होता. तर दुसऱ्या बछड्यास सहाव्या दिवशी त्याच्या आईने सुखरूप नेले होते. यानंतर बिबट्याची मादी शिवारातून निघून गेली असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. मात्र, बिबट्याची मादी याच शिवारात फिरत असून, त्या मादीने मंगळवारी मध्यरात्री सुमारास धोंडेवाडी येथील वस्तीवर बांधलेल्या घोड्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये घोड्याचा मृत्यू झाला. या घोड्याच्या पोटातील भाग बिबट्याने खाऊन तो पसार झाला.हा बिबट्या गेल्या चार दिवसांपासून उपाशीपोटी असल्याने तो भक्ष्याच्या शोधात फिरत राहिला होता. त्याला काही खाद्य मिळाले नसल्याने बिबट्याने चक्क मानवी वस्तीत प्रवेश केला आणि गडाळकी नावाच्या वस्तीवर बांधलेल्या घोड्यावर हल्ला करून त्याला ठार केले. बिबट्याची मादी अजून किती दिवस या परिसरात राहणार? या धास्तीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतात जायलाही भागातील शेतकरी घाबरू लागले आहेत. अजून कोणत्या पाळीव प्राण्यांचा जीव जाण्याऐवजी या बिबट्याचा वनखात्याने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतून केली जात आहे.
धोंडेवाडी परिसरात पुन्हा बिबट्याची डरकाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:10 PM