सातारा : अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. असे असताना सराफा, कापड, स्टेशनरी आदी दुकाने सुरू ठेवणाऱ्या शहरातील आठ दुकानदारांवर शाहूपुरी पोलीस ठाणे व सातारा पालिकेकडून कारवाई करण्यात आली. पालिकेच्या पथकाकडून ही सर्व दुकाने मंगळवारी सील करण्यात आली.
सातारा जिल्ह्यासह शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात यावी, कोरोनाचे संक्रमण थांबावे, यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. याअंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. असे असताना शहरातील कापड, सराफा, स्टेशनरी यांसह काही दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. अशा दुकानदारांवर पालिकेकडून प्रथम तीन हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. दुकाने पुन्हा सुरू ठेवल्यास दुसऱ्यांदा ते सील करण्याचा इशाराही पोलीस प्रशासन व पालिकेकडून देण्यात आला होता. या नियमांचे उल्लंघन करून आपली दुकाने सुरू ठेवणाऱ्या शहरातील संबंधित आठ दुकानदारांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. प्रतापगंज पेठ, खणआळी, पोवई नाका येथील एकूण आठ दुकाने शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या सूचनेनुसार पालिकेच्या पथकाने सील केली. या दुकानांना बांबूचे बॅरिकेट्स लावण्यात आले आहे.
(चौकट)
पंधरा हजारांचा दंड
पोवई नाक्यावरील एका नामांकित कापड दुकानदारावर पालिकेच्या पथकाने मंगळवारी पंधरा हजार रुपये दंडात्मक कारवाई केली. अत्यावश्यक सेवेतून कापड दुकानदारांना वगळण्यात आले आहे. असे असताना दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी पालिकेने ही कारवाई केली.
फोटो : मेल
सातारा पालिकेच्या पथकाने मंगळवारी प्रतापगंज पेठ व खणआळीतील काही दुकाने सील केली.