पुसेगाव : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता बाकी व्यावसायिकांना सकाळी नऊ ते दोन या वेळेत निर्बंध लादून दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली. मात्र, काही व्यावसायिक निर्बंधांचे उल्लंघन करत असल्याने पुसेगाव येथील सहा दुकाने सील करण्यात आली. दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
गेल्या चार महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यांनी उच्चांक गाठलेला आहे. तिसऱ्या टप्प्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाहता लागू केलेल्या निर्बंधांचे लोक सर्रासपणे उल्लंघन करत होते.
पुसेगाव येथील बाजारपेठेमध्ये वारंवार सूचना देऊनही व्यावसायिक आपले दुकान दुपारनंतर सुरू ठेवत असल्याचे निदर्शनास येताच, महसूल प्रशासनाचे पुसेगाव तलाठी गणेश बोबडे, मंडलाधिकारी विठ्ठल तोडरमल, कोतवाल सुरेश कंठे, ग्रामपंचायत कर्मचारी रविराज जाधव यांनी या निर्बंधाची पायमल्ली करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली.