लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या दुकानांसह इतर ठिकाणांच्या दहा दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामधील दोन दुकानदारांनी दुसऱ्यांदा नियम मोडल्याने त्यांची दुकाने सील केली आहेत. संबंधित दुकानदारांकडून १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस व पालिकेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
पोलीस व पालिकेच्या संयुक्त पथकाने गुरुवारी दुपारी शहरात गर्दीची चाहूल लागताच फिरून कारवाईची धडक मोहीम राबवली. शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई केली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर दुकाने उघडण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही शहरातील अनेक दुकानांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याची बाब निदर्शनास आल्याने संयुक्त पथकाने कारवाईची धडक मोहीम राबवली.
जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर ६ व दिलेल्या वेळेपेक्षा जादा वेळ दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी ४ अशा १० दुकानांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून १० हजार रुपये दंडही वसूल केला. त्यापैकी दोन दुकानदारांनी दुसऱ्यांदा नियम मोडल्यामुळे त्यांची दुकाने सील केली. या कारवाईत दिवसभरात मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश काळे, सागर निकम, तेजस शिंदे, सुभाष बागल, वैभव आरने यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी होते.
फोटो ओळ : मलकापुरात दोन दुकानदारांनी दुसऱ्यांदा नियम मोडल्यामुळे त्यांची दुकाने सील करण्यात आली. (छाया : माणिक डोंगरे)