लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘डिअर सीम युझर, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग असून प्लीज, आमच्या कस्टमर सेवेशी संपर्क साधा, नाहीतर तुमचे सीमकार्ड चोवीस तासांत ब्लॉक होईल,’ असा मेसेज जर तुम्हाला येत असेल तर सावधान. कारण हा मेसेज फसवा असून, या माध्यमातून तुमचे बँक अकाऊंट मोकळे करण्याचा उद्योग काही ऑनलाईन ठकसेनांनी सुरू केला आहे.
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार अजूनही जोमात सुरू आहेत. पोलिसांकडून खबरदारीच्या सूचना देऊनही अनेक नागरिक अशा फसव्या भूलथापांना बळी पडत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बीएसएनएलच्या ग्राहकांना सीम व्हेरिफिकेशनचे मेसेज येत आहेत. नागरिकही सीमकार्ड बंद पडेल या भीतीने कोणतीही खातरजमा न करता ठकसेनांच्या सूचनांचे पालन करत आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्ले-स्टोअर वरून टीम व्ह्युअर, एनीडेस्क व अन्य अॅप डाऊनलोड करीत आहेत आणि इथेच घोळ होत आहे.
ऑनलाईन फसवणुकीच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून हे ठकसेन ग्राहकांचा मोबाईल डाटा क्लोनिंगद्वारे शेअर करून थेट त्यांचे बँक खाते रिकामे करत आहेत. इतर जिल्ह्यांप्रमाणे सातारा जिल्ह्यातही अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत. तरीदेखील अनेक नागरिक फसव्या मेसेजेसला बळी पडत आहेत. आपल्याला आलेला कोणताही मेसेज कंपनीकडून आलेला आहे किंवा नाही याची खातरजमा केली तरच नागरिकांची आर्थिक फसवणूक टळू शकते.
(चौकट)
अॅप डाऊनलोड करू नका
सीम ब्लॉक होऊ नये म्हणून ठकसेन ग्राहकांना वेगवेगळे अॅप डाऊनलोड करण्यास सांगतात. अॅप डाऊनलोड करताच ग्राहकाच्या मोबाईलमधील डाटा क्लोनिंगद्वारे शेअर करून बँक खात्यातून रक्कम वळती करून घेतली जाते. खात्यातून रक्कम कमी झाल्यानंतरच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे असे अॅप डाऊनलोड करण्यापासून ग्राहकांनी सजग राहणे गरजेचे आहे.
(चौकट)
असा कॉल व मेसेज आल्यास काळजी घ्या
१. दूरध्वनी कंपनीकडून ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे फसवे मेसेज पाठविले जात नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी व्हेरिफिकेशन तसेच इतर कोणत्याही प्रकारचे मेसेज आल्यास तातडीने संबंधित कंपनीशी संपर्क साधावा.
२. फोनवरून अथवा मेसेजवरुन जर कोणी कोणत्याही प्रकारचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करा असे सांगत असेल तर त्यावर चुकूनही विश्वास ठेवू नका.
३. ऑनलाइनद्वारे आजवर अनेकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे अशा फसव्या मेसेज व कॉलपासून फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी.
(चौकट)
अशी काळजी घ्या
आपले सीम ब्लॉक होणार आहे किंवा नाही याची प्रथम कंपनीकडे शहानिशा करा. कोणत्याही अनोळखी फोन व मेसेजवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही प्रकारचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करू नका. कोणालाही आपली वैयक्तिक माहिती देऊ नका.
(पॉइंटर)
मोबाईलवरून फसवल्याच्या तक्रारी
२०१९ : १३
२०२० : ७
२०२१ : ३