पाचगणी : करहर, ता. जावळी येथील पोलीस चौकीच्या हद्दीतील एका गावातील विवाहित महिला नऊ वर्षांपूर्वी कोणासही न सांगता बेपत्ता झाली होती. याप्रकरणी करहर पोलिसांनी घटनेचा तपास करीत बेपत्ता विवाहितेचा शोध घेतल्याने हे प्रकरण निकाली निघाले आहे.
याबाबत माहिती अशी की, नऊ वर्षांपूर्वी करहर पोलीस दूरक्षेत्र हद्दीमधील एका गावातील विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. त्या संदर्भात फिर्याद दाखल झाली होती. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे फिर्यादीची चोवीसवर्षीय पत्नी राहत्या घरातून रात्री साडेतीनच्या सुमारास कोणासही न सांगता निघून गेली. ती घरी परत आलीच नाही. तिचा शोध नातेवाइकांकडे घेतला असता कोठेच आढळून आली नाही. अशी फिर्याद करहर चौकीत दाखल झाली होती.
वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जान्हवे-खराडे, मेढाचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली करहर पोलीस दूरक्षेत्राचे ठाणे अंमलदार डी.जी. शिंदे यांनी सहकारी सुनील रोकडे, उद्धव पिसाळ आणि कुसुंबीचे पोलीस पाटील एकनाथ सतार यांच्या सहकार्याने या प्रकरणाचा छडा लावला. विवाहितेला शोध घेऊन पोलीस ठाण्यात हजर करून सदर प्रकरण निकाली काढले.