गुहागर : काळ्या मातीतील दगड या लाल मातीने सामावून घेतला. आयुष्याच्या उत्तरार्धात आता पुन्हा गावाकडे न जाता या लाल मातीतच राहणार असल्याची इच्छा ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र साहित्य परिषद, चिपळूण शाखेचे अध्यक्ष श्रीराम दुर्गे यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र साहित्य परिषद, गुहागर शाखेच्यावतीने ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम दुर्गे यांचा साहित्यिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. दुर्गे म्हणाले की, नोकरीच्या निमित्ताने जेव्हा पहिल्यांदा येथे आलो तेव्हा आपले येथे कोण आहे, असे वाटले. पण आता निवृत्तिनंतर पुन्हा गावाकडे जायची वेळ आली तेव्हा आता आपले तिकडे कोण आहे, असा प्रश्न पडल्याचे त्यांनी सांगितले.गुहागर येथे साहित्य संमेलन घेत असताना चिपळूणमधून श्रीराम दुर्गे, अरुण इंगवले या अनुभवी साहित्यिकांचे मार्गदर्शन, गुहागरमधून अॅड. संकेत साळवी यांच्या शिवतेज प्रतिष्ठान व सहकाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच संमेलन यशस्वी होऊ शकले, असे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर म्हणाले. यावेळी साहित्यिक, कवी अरुण इंगवले, अॅड. संकेत साळवी यांनी मनोगत व्यक्त केले. साहित्य संमेलनासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या मनाली बावधनकर, शिवतेज फाऊंडेशनचे अॅड. संकेत साळवी, अलंकार विखारे, मनोज बारटक्के, बाळासाहेब ढेरे, अंकुश विखारे, हेमंत बारटक्के, राहुल कनगुटकर, शिवांजली पुरस्कारप्राप्त कवी ज्ञानेश्वर झगडे, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी बाबासाहेब यथिनकर, डोंबिवली येथे नुकत्याच झालेल्या एकांकिका स्पर्धेतील प्रथम क्रमांकप्राप्त शिक्षक विवेकानंद जोशी, ज्येष्ठ कवी अरुण इंगवले, गीतकार राष्ट्रपाल सावंत यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी कवी संतोष गोणबरे, कृषी विस्तार अधिकारी विनोदकुमार शिंदे, वैशाली जाधव, बाबासाहेब राशिवकर, अरुण इंगवले, ज्ञानेश्वर झगडे, मनाली बावधनकर यांनी कविता सादर केल्या. (प्रतिनिधी)
उत्तरार्धात लाल मातीतच राहणार
By admin | Published: April 01, 2015 10:13 PM