खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत गेला. दुसऱ्या लाटेत तर साडेपाच हजार लोकांना कोरोना झाला आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा १० हजारांपेक्षा जास्त झाला. असे असले तरी सध्या तालुक्यात २७० रुग्ण असून, केवळ १८९ जणांवर उपचार सुरू आहेत. विलगीकरण कक्ष बाधितांसाठी आधार ठरू लागले आहेत.
खंडाळा तालुक्यातील ६३ गावांमध्ये कोरोनाने हातपाय पसरले आहेत. कोरोनाची एकूण संख्या १०५०८ पर्यंत पोहोचली आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांपैकी शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ११६, लोणंद केंद्रांतर्गत ९१, तर अहिरे केंद्राच्या अखत्यारीत ६३ बाधित आहेत. यापैकी केवळ १८९ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत, तर ८१ जण विलगीकरण कक्षात आहेत. गेल्या चार दिवसांत बाधितांची संख्या तीसपेक्षा कमी आली असल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, खंडाळा तालुक्यात झपाट्याने वाढत गेलेली रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले. प्रत्येक गावात स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला. नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी यासाठी गावोगावी उपाययोजना केल्या. हेच कक्ष कोरोनाला आळा घालण्यासाठी आधार ठरत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे.
चौकट :
१२ हजार कोमॉर्बिड व्यक्ती...
खंडाळा तालुक्यातील शिरवळ, अहिरे, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ११९२३ कोमॉर्बिड नागरिकांची नोंद आहे. यापैकी आजपर्यंत २५२ लोक कोरोनाबाधित झाले आहेत. तालुक्यात एकूण १२१६ गर्भवती महिला आहेत. यापैकी २९९ महिलांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यामध्ये ३७ महिला कोरोनाबाधित आढळून आल्या.
............
६५ ठिकाणी विलगीकरण कक्ष...
कोरोनाकाळात प्रशासनाने नागरिकांना निर्बंध घालण्यासाठी तब्बल ७२८ कंटेन्मेंट झोन जाहीर केले होते. यापैकी अनेक ठिकाणी शिथिलता देण्यात आली आहे. सध्या तालुक्यात अहिरे विभाग ६, शिरवळ विभाग ५७, तर लोणंद विभागात १८, असे मिळून ८१ कंटेन्मेंट झोन सुरू आहेत. ६५ ठिकाणी विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात आले आहेत.
............... ..................................