सातारा : मुख्याध्यापकपदी बढती देण्यासाठी तसेच सोयीस्कर ठिकाणी बदली करण्यासाठी शिक्षण संस्थेच्या सचिवाने २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याची धक्कादायक घटना महाबळेश्वर तालुक्यात उघडकीस आली. लाचेची रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या सचिवास गुरुवारी रंगेहात पकडले.धोंडिबा कृष्णा जाधव असे अटक केलेल्याचे नाव आहे. महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथील कोयना एज्युकेशन सोसायटीत सचिव म्हणून तो कार्यरत आहे. तक्रारदाराला मुख्याध्यापक पदावर बढती मिळवून देण्यासाठी तसेच सोयीच्या ठिकाणी नेमणूक करण्यासाठी त्याने २५ हजार रुपये मागितले होते. तक्रारदाराने यासंदर्भात दि. ३० सप्टेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा येथील कार्यालयात तक्रार दाखल केली होती.तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. जाधव याने तक्रारदारास कोयना एज्युकेशन सोसायटीच्या तळदेव येथील कार्यालयात लाचेची रक्कम घेऊन बोलाविले होते. तक्रारदाराकडून २५ हजार रुपये लाच स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. महाबळेश्वर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. याबाबत लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक बी. एस. कुरळे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
शिक्षण संस्थेचा सचिव लाच घेताना जाळ्यात
By admin | Published: October 01, 2015 11:27 PM