सातारा : लॉकडाऊन काळाचा सदुपयोग करून घेत संस्कार वर्ग शाहूपुरीने विद्यार्थ्यांच्या बालमनावर निसर्गाशी मैत्री जोडण्याचा, निसर्ग जपण्याची, निसर्गाच्या जवळ जाण्याचा संस्कार बिंबविण्याचा प्रयत्न म्हणून भैरोबा डोंगरमाथा परिसरात सीडबॉलचे रोपण करण्यात आल्याची माहिती भारत भोसले यांनी दिली.
चला मैत्री करू या निसर्गाशी... संस्कार वर्गाच्या या उपक्रमास बालकुमारांसह माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. संस्कार वर्ग शाहूपुरीने शालेय विद्यार्थी व पालकांना चला मैत्री करू या निसर्गाशी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक विद्यार्थिमित्रांनी आपापल्या परसबागेत तसेच शेतशिवारात स्वत: अनेक फळझाडे, फुलझाडे व औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. यामध्ये विशेष करून आंबा, सीताफळ, पपई, काजू, शेवगा, तूर, पेरू, उंबर, तुळस, कोरफड, लिंबू, पुदिना, कडिपत्ता, वेलची, कारले, कोथिंबीर, आळू, अंबाडी, वांगी, टोमॅटो, कलिंगड, पावटा, घेवडा व विविध प्रकारच्या फुलझाडांचा समावेश आहे.
या उपक्रमाचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना व पालकांना चिंच, करंज, कडूलिंब, जांभूळ अशा सहजपणे उपलब्ध होणाऱ्या वृक्षांच्या बिया गोळा करून छोट्या सीडबँकेची निर्मिती करण्याचेही आवाहन केले होते. त्यानुसार विद्यार्थी व पालकांनी याही आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत विविध सीडबँक तयार करून त्या भैरोबा डोंगरमाथा परिसरात योग्य अंतर राखून काळजीपूर्वक टाकण्यात आल्या आहेत.
.............