ढेबेवाडी : ढेबेवाडी परिसरात आठ दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे शासकीय मालमत्तेसह शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. खरिपाची पेरणी केलेल्या शेतातच पावसाचे पाणी साचल्याने पेरणी केलेले बियाणे कुजल्याने आता शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून पाटण तालुक्यात कोसळणाऱ्या पावसाने डोंगरपठारावरील वाड्यावस्त्या आणि बहुतेक गावे संपर्कहीन झाले. अनेक गावांना जोडणारे रस्ते, फरशीपूल आणि साकव यांचे मोठे नुकसान झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या विभागात हजारो हेक्टर खरीप क्षेत्र आहे. नुकत्याच येथील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी उरकली होती. काही ठिकाणी पेरणीची धांदल चालूच होती. त्याचदरम्यान या विभागात पावसाने थैमान घातले. पावसाचा जोर सातत्याने पाच दिवस सुरूच राहिल्याने पेरणी केलेल्या शेतात पाणी साचल्याने तळीच्या तळी निर्माण झाली आहेत. परिणामी पेरणी केलेले बियाणे सातत्याने पाण्याखाली राहिल्याने कुजून गेले आहे. यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून दुबार पेरणीचे संकट त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.
पंचनामे पारदर्शक व्हावे..
नुकसान झालेल्या मालमत्तांसह शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने दिले. मात्र, संबंधित यंत्रणेकडून शेतावर जाऊन पंचनामे केले जातात का? की शासकीय कार्यालयातूनच वरिष्ठांना माहिती दिली जाते यावरही वरिष्ठांकडून अंकुश असायला हवा. त्याचबरोबर पंचनामेही पारदर्शक व्हायला हवे, अशी अपेक्षा शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.