लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : बहीण-भावाच्या नात्यातील पवित्र सण रक्षाबंधन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी बहीण-भाऊ एकमेकांच्या गावी जाऊन राखी बांधत असतात. त्यामुळे एसटी महामंडळाने जादा गाड्या सुरू केल्या आहेत. त्याचप्रमाणे ट्रॅव्हल्सवालेही हा हंगाम पदरात पाडून घेण्यासाठी तयारीत आहेत; मात्र त्यांचा दर प्रवासी, वेळ पाहून ठरत असल्याने आताच कोणी काही बोलायला तयार नाहीत.
सातारा आणि पुणे, मुंबई यांचे जवळचे नाते आहे. या भागातील मुलीचे लग्न ठरविताना शक्यतो आपल्याच जिल्ह्यात किंवा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पाहुणे पाहत असतात; मात्र लग्नानंतर नोकरीच्या निमित्ताने ते पुणे, मुंबईला स्थायिक झालेले असतात. त्यामुळे त्यांना माहेरी सारखे सारखे येण्यास जमत नाही. अशावेळी रक्षाबंधनाला भाऊ बहिणीकडे तर दिवाळीला भाऊबीजसाठी बहिणी भावाच्या गावी येत असतात. स्वत:च्या वाहनाने काहीजण जात असतात. मात्र लांब पल्ल्याचा प्रवास असल्यास खासगी प्रवासी बस ट्रॅव्हल्सचा वापर केला जातो; मात्र त्यांचे दर एसटीसारखे स्थिर नसतात. त्यांना कोणी मालक नसल्याने रात्रीच्या वेळी प्रवासी असल्यास सोबत महिला असतील तर कितीतरी पटीने दर आकारले जातात. त्यामुळे अडवणूक होत असल्याचा आरोप होत असतो.
चौकट
ट्रॅव्हल्सची संख्या दुप्पट
सातारा जिल्ह्यातून कोरोना काळात सार्वजनिक प्रवासी वाहतुकीस परवानगी नव्हती. त्यामुळे हे व्यावसायिक अडचणीत आले होते.
आता कोठे खासगी प्रवासी वाहतूक सुरू होत आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरुन पहिल्यापेक्षा दुप्पट संख्येने या गाड्या धावत आहेत.
कोट
सातारा जिल्ह्यातील गोंदवलेतून मुंबईला एसटीला साडेचारशे रुपयांत जाता येते; मात्र खासगी प्रवासी वाहनाने जायचे असल्याचे एक हजार रुपयांची मागणी केली जाते. ही एक प्रकारे अडवणूकच आहे; मात्र कोरोना काळात ग्रामीण भागातून एसटी धावत नसल्याने नाईलाजाने जावे लागत होते.
- एक प्रवासी.