रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील कठापूर येथे अवैध मुरूम उत्खनन सुरू असताना घटनास्थळी तलाठी आल्याने उत्खननासाठी वापरलेली वाहने संशयिताने कारवाईच्या भीतीने गायब केली होती. मात्र, रहिमतपूर पोलिसांनी तपास करून तब्बल १६ दिवसांनंतर जेसीबी व मुरुमासह डंपर जप्त केला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तलाठी अंकुश घोरपडे व कोतवाल बक्शुद्दीन भालदार हे एका वस्तीवरून जात असताना कठापूर येथील गट नंबर ७०१ मध्ये विना नंबरप्लेटच्या जेसीबीच्या सा'ाने मुरूम उत्खनन सुरू असल्याचे दिसून आले. शेजारी मुरूम वाहतुकीसाठी डंपर (एमएच ११ एएल ७८२१) हा उभा होता. त्या ठिकाणी उभा असलेल्या संतोष निवृत्ती केंजळे याला मुरूम उत्खननासाठी शासकीय परवाना घेतला आहे का? अशी तलाठी घोरपडे यांनी विचारणा केली असता केंजळे याने परवाना नसल्याचे सांगितले.
तलाठ्यांनी मुरूम उत्खननाचा पंचनामा करून वाहने तहसील कार्यालय कोरेगाव येथे घेऊन येण्याबाबतची सूचना केली. मात्र, संतोष केंजळे याने वाहनचालकांना वाहने कोरेगावला नेऊ नका. जेसीबी व डंपर आपल्या वस्तीवर घेऊन चला, असे सांगितले तसेच तलाठ्यांना तुम्हाला काय करायचे ते करा, मी बघून घेतो, अशा भाषेत दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी तलाठ्यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संतोष केंजळे याच्यावर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
गौणखनिज उत्खननासाठी वापरलेली वाहने पोलिसांना सापडली नव्हती. अखेर १६ दिवसांनंतर पोलिसांनी गौणखनिज उत्खनन व वाहतुकीसाठी वापरलेली जेसीबी व डंपर जप्त करून रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या आवारात लावली आहेत.अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणलेरहिमतपूर परिसरात अवैध उत्खननासंदर्भात महसूल प्रशासन व पोलिसांनी केलेली कठापूर येथील मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, शासकीय नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सहायक पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ यांनी दिला आहे.