सातारा : वारंवार आवाहन करुनही कर भरणा न करणाऱ्या मिळकतदारांवर पालिकेच्या वसुली विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. पाच लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या शहरातील ३० मिळकदारांना जप्तीची नोटीस बजावण्यात आली असून, कारवाई टाळण्यासाठी तातडीने थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे.मालमत्ता कर, पाणी कर, स्वच्छता कर, अग्निशमन कर, विकास कर आदी प्रकारचे कर पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. या करातूनच नागरिकांना पायाभूत सेवा-सुविधा पुरविल्या जातात. शहरातील बहुतांश मिळकतदार मालमत्ता व पाणीकर वेळेत जमा करतात. मात्र, काही मिळकतदार कर भरण्यास टाळाटाळ करतात. अशा मिळकतदारांना कारवाईला सामोरे जावे लागते.पालिकेला यंदा पाणीपट्टी व घरपट्टीचे मिळून ३८ कोटी ४१ लाख रुपये वसूल करावयाचे आहेत. यापैकी पालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत २२ कोटींचा महसूल जमा झाला असून, येत्या महिनाभरात आणखी १६ काेटी ४१ लाखांचे उद्दिष्ठ गाठावयाचे आहे. हे उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी पालिकेने शहरातील ४ हजार मिळकतदारांना नोटीस बजावून कर भरण्याचे आवाहन केले आहे.तर पाच लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या ३० मिळकतदारांना जप्तीची नोटीस बजावली आहे. पालिकेने गेल्या पंधरा दिवसांत १२ थकबाकीदारांचे नळकनेक्शन तोडले असून, थकबाकीदारांनी कटू कारवाई टाळण्यासाठी तातडीने कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.
साताऱ्यातील ३० मिळकतदारांना पालिकेकडून जप्तीची नोटीस
By सचिन काकडे | Published: February 29, 2024 6:53 PM