वडूज : वडूज तहसील कार्यालयाचे नूतन प्रशासकीय इमारतीत स्थलांतर झाले असले तरी जुन्या बिटिशकालीन इमारतीत सेतू व अन्य कार्यालय अद्याप सुरूच आहे. एकेकाळी नागरिकांनी गजबजणारा तहसील कार्यालयाचा परिसर आता जप्त करण्यात आलेल्या वाहनांनीच झाकोळला जात आहे. ही वाहने नागरिकांना अडथळा ठरत असून, प्रशासनाला मात्र याकडे लक्ष द्यायला वेळच नाही.
तालुक्यातील अवैध वाळू व्यवसाय करणारे वाहने महसूल व पोलीस विभाग पकडून जुन्या तहसील इमारतीत लावतात. या परिसरात ये-जा करणाºयांचे हाल होत आहेत. गेली कित्येक महिने ही वाहने दंडाच्या कारवाईच्या प्रतीक्षेत उभी आहेत. ही इमारत वास्तविक पाहता नगरपंचायतीला भाडेतत्त्वावर द्यायचे निश्चित असताना जाणीवपूर्वक टाळाटाळ होत आहे.
दोन वर्षांपूर्वी तालुक्याच्या मुख्यालय असलेल्या वडूज शहराला नगरपंचायातीचे स्वरूप प्राप्त झाले. नगरपंचायतीची व्याप्ती पाहता सध्या असलेली इमारत ही तोकडी व अडगळीची बनू लागली आहे.नव्याने शासकीय योजनेसाठी कर्मचारी व अधिकाºयांची भरती लक्षात घेता प्रत्येक विभागाला स्वतंत्र कार्यालय असण्याची आवश्यकता आहे. मात्र, यापूर्वी असलेल्या सत्ताधाºयांची मानसिकता लक्षात घेता. नवीन जागेच्या शोधात नुसते प्रस्ताव दाखल करण्यातच दोन वर्षे वाया घालवली. त्या वेळचे विरोधक आता सत्ताधारी झाले असून, या प्रस्तावाला आत्ताचे सत्ताधारी कोणते स्वरूप देतात, ते वडूजकरांना पाहावयास मिळणार आहे.जागेचा निर्णय त्वरित व्हावाजुनी तहसील कार्यालय सुसज्ज दगडी इमारत सुमारे १ हजार ७४९ चौरस मीटर इतकी आहे. सुस्थितीतील या इमारतीमध्ये जर नगरपंचायत स्थापन झाली, तर नगरपंचायतमधील प्रत्येक विभागाला स्वतंत्र कार्यालय स्थापन करता येईल. तसेच या इमारतीलगत असणारी मोकळी जागाही नगरपंचायतला इतर करापोटी उत्पन्न वाढीसाठी वापरात येईल. त्यामुळे या जागेचा तातडीने निर्णय व्हावा, अशी वडूजकरांसह तालुक्यातील जनतेची मागणी आहे.प्रस्तावरुपी होकार
शहराच्या मध्यभागी असलेली ही इमारत सर्व सोयीनियुक्त असल्याने व इमारतीच्या हाकेच्या अंतरावरच बसस्थानक, प्रशासकीय इमारत आणि नव्याने होत आहे. पोलीस ठाण्याची ग्रीन इमारत नगरपंचायतीच्या व वडूज शहराच्या वैभवात भर टाकू शकते. सर्वसामान्य वडूजकरांच्या मागणीला नगरपंचायत प्रशासनाने प्रस्तावरुपी होकार दिला आहे. मात्र, माशी नेमकी कोठे शिंकते आहे, याचा मागमूस लागणे काळाची गरज ठरत आहे.