पुसेगाव : पुणे विभागाचे माजी विभागीय आयुक्त व निढळचे (ता. खटाव) सुपुत्र चंद्रकांत दळवी यांची पुणे महापालिकेच्या हेरिटेज काॅन्झर्वेशन कमिटी तथा वारसा जतन समितीच्या अध्यक्षपदी शासनाने नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र शासन नगरविकास खाते यांनी एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीनुसार ऐतिहासिक व सांस्कृतिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासंदर्भात वारसा जतन समिती (हेरिटेज काॅन्झर्वेशन कमिटी) स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत दळवी यांची नेमणूक करण्यात आली आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तू, वारसा असणारी स्थळे यांचे जतन, संरक्षण करणे, त्यासाठी महापालिकेला सल्ला देण्यासाठी ही सल्लागार समिती काम करते.
या समितीमध्ये एकूण नऊ सदस्य असून, शहर अभियंता हे समितीचे सदस्य सचिव आहेत. या समितीची पहिली बैठक दि. ९ जून २०२१ रोजी पुणे महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली.