वडूज : पडळ, (ता. खटाव) येथील कारखान्यातील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल असलेला अंजनकुमार घाडगे याला वडूज पोलिसांनी रविवारी अटक केली. कारखान्याचे को-चेअरमन मनोज घोरपडे यांचा स्वीय सहायक म्हणून घाडगे हा काम करत होता. न्यायालयाने मंगळवार दि. १६ पर्यत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
पडळमधील माण अॅग्रो लि. येथे चीफ केमिस्ट पदावर जगदीप थोरात (रा. गोवारे, ता. कऱ्हाड) हे कार्यरत होते. या कारखान्यात अफरातफर केल्याच्या कारणावरून त्यांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत थोरात यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह १९ जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खूनप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये कारखान्याचे को-चेअरमन मनोज घोरपडे (वय ४४) संग्राम घोरपडे (वय ४०, रा. मत्यापूर, ता. सातारा), सनी क्षीरसागर (वय २६, रा. गोडोली, सातारा), रणजित सूर्यवंशी (वय २२), शुभम घाडगे (वय २२, दोघेही रा. कामेरी, ता. सातारा), रोहित कोलगुडे (वय २५, रा. फत्यापूर, ता. सातारा) यांचा समावेश आहे. तर रविवारी मनोज घोरपडे यांचे स्वीय सहायक अंजनकुमार घाडगे याला अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात एकूण सात जणांना आतापर्यंत अटक केली आहे. अद्याप बारा संशयित फरार असून, वडूज पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विविध ठिकाणी चार पथके रवाना केली आहेत.