म्हसवड : माण - खटावचे आमदार जयकुमार गोरे मायणी मेडिकल कॉलेज, तेथील हॉस्पिटल, दहिवडी, म्हसवड येथील तीनशेहून अधिक बेड्स आणि कोरोना उपचार केंद्रांच्या माध्यमातून नि:स्वार्थीपणे हजारो कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. त्यासाठी त्यांनी खूप मोठी व्यवस्था उभी केली आहे. विरोधकांनी कितीही कोंडी केली तरी त्यांचे जनतेसाठी सकारात्मक काम सुरूच आहे. कोरोना काळातील त्यांच्या रुग्णसेवेला ईश्वराचे पाठबळ आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने म्हसवड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, माणगंगा शैक्षणिक संस्था संचलित मोफत जनसेवा कोविड उपचार केंद्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक मुकुंद आफळे, सहकार्यवाहक समीर सोनी, नगराध्यक्ष तुषार विरकर, मुख्याधिकारी सचिन माने, भाजप तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, घनश्याम केसकर, जि. प. सदस्य अरुण गोरे, जयकुमार शिंदे, माजी नगराध्यक्ष विलासराव माने, सुनील पोरे, डॉ. कोडलकर, डॉ. सागर खाडे, डॉ. शेटे, डॉ. अनिता खरात, रामचंद्र नरळे, नितीन दोशी, अकिल काझी, लुनेश विरकर, डॉ. वसंतराव मासाळ, म्हसवड पालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले, आगामी सहा महिने राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. जनतेने लसीकरणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतातील दोन आणि विदेशी काही लसींचे उत्पादन वाढवून महिन्याला २९ कोटी डोस प्रतिमहिना उपलब्ध होणार आहेत. केंद्राकडून राज्याला सर्वाधिक रेमडेसिविर इंजेक्शन आणि १७५० टन ऑक्सिजन दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, मायणी मेडिकल कॉलेज आज हजारो रुग्णांचा जीव वाचविण्यात मोलाची भूमिका निभावत आहे. मतदारसंघात रुग्णांवर उपचार करताना काही कमतरता जाणवली तर शासकीय अधिकाऱ्यांना जयकुमार गोरेंचीच मदत होत आहे. आम्ही फलटण येथेही कोरोना उपचार केंद्र सुरू करीत आहोत. या भागातील रस्त्यांसाठी बाराशे कोटींच्या निधीची तरतूद केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
आमदार जयकुमार गोरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीमुळे मायणी मेडिकल कॉलेज, तेथील पाचशे बेडचे हॉस्पिटल आज सुरू आहे. आजपर्यंत आम्ही ३५०० पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करून कोरोना विरुद्धची लढाई समर्थपणे लढत आहे. म्हसवडच्या कोरोना उपचार केंद्रात १०० बेड्सच्या माध्यमातून रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. शिवाजीराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. वसंतराव मासाळ यांनी मानले.
चौकट
औषधांसाठी ४५ लाखांचा निधी
कोरोना काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांसाठी ४५ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. म्हसवड केंद्रात रुग्णांच्या जेवण, नाष्ट्याची सोय केली आहे. शासनाकडून मिळाली तर ठीक, नाहीतर रेमडेसिविर इंजेक्शन मूळ किमतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
फोटो : म्हसवड येथील जनसेवा कोविड उपचार केंद्राचा ऑनलाईन प्रारंभ करताना देवेंद्र फडणवीस, त्यांच्याशी संवाद साधताना आ. जयकुमार गोरे.