दत्ता यादव।सातारा : घरचा डुकरांचा व्यवसाय. कैलासचं सातत्यानं कारागृहात जाणं-येणं सुरू असायचं. वकिलांची फी देण्यासाठी पैसे नसल्यामुळे घरातील डुकरं विकावी लागत होती. मात्र कैलासच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता. पोलिसांनी तडीपार केल्यामुळे हायसं वाटत होतं. त्याच्या जीवाला धोका तरी नव्हता, असं कैलासची आई आक्रोश करत सांगत होती.
कैलास लहानपणापासूनच खोडकर होता. शाळेत तो कधीच गेला नाही. वारंवार वाद आणि चोऱ्यामाºयांशिवाय त्याला चैन पडत नव्हती. लहान वयातच त्याच्यावर पालकत्वाची जबाबदारी आली. त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मात्र, तरीही त्याच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता. पोलिसांनी अटक केल्यानंतर तो दोन-दोन महिने ‘आत’मध्येच असायचा. त्याला जामिनावर सोडविण्यासाठी घरात पैसे नसल्यामुळे त्याचा जेलमधला मुक्काम वाढत होता. त्यामुळेच त्याचा आई-वडिलांवररोष वाढत होता. अनेकवेळा घरातील डुकरं विकून कैलासला जेलमधून आईनं सोडवून आणलं होतं. शनिवारीही त्याने तडीपारीचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली होती.
आईने आपल्याला जामिनावर सोडवावं, अशी त्याची इच्छा होती. परंतु घरात एकही डुक्कर शिल्लक नसल्यामुळे त्याला कसे सोडवून आणायचे, असा प्रश्न त्याच्या आईसमोर आवासून उभा होता.कैलासला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. सध्या त्याची पत्नी गर्भवती आहे. असे असताना कैलासचा मृत्यू झाल्याने त्याच्या आईने जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर प्रचंड आक्रोश केला. पोलिसांनीही कैलासला अनेकदा सुधारण्याची संधी दिली होती. परंतु त्याचे वागणे त्रासदायक ठरत होते. अटक केल्यानंतर तो बेड्यासह पळून गेल्याने पोलिसही कामाला लागले होते.कैलासचा खुनापाठीमागे तीन ते चारजणांचा हात असल्याचा आरोप नातलगांनी केला आहे. काही संतप्त नातलगांनी पोलीस मुख्यालयासमोर जावून आरोपींच्या अटकेची मागणीही केली.अन् तो जेलमधून सुटल्याचे आईला समजले..बोलण्यात पटाईत असलेल्या कैलासनं स्वत:जवळ पैसे नाहीत. मात्र बाहेर आल्यानंतर तुमची फी देतो, असे वकिलांना सांगितलं. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वकिलांनी त्याला जामीन मिळवून दिला. घरात आल्यानंतरच तो जेलमधून सुटल्याचे आईला समजले. ‘तुम्ही माझे आई-वडील नाहीत. तुम्ही माझ्यासाठी मेला आहात,’ असा गोंधळ घालत कैलासनं आईला ढकलून देत रागात घरं सोडलं होतं. मात्र, सकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्यानं त्याच्या आईवर आभाळ कोसळलं.रात्री तो गुपचूप यायचा घरी..कैलास तडीपार असल्यामुळे तो पोलिसांची नजर चुकविण्यासाठी गुपचूप घरात यायचा. त्याचे वागणे वडील नथू गायकवाड यांना पटत नव्हते. त्यामुळे बापलेकांमध्ये सतत वादावादी होत होती. कैलास घरी आल्यानंतर वडील त्याला नेहमी सुधारण्याचा सल्ला देत होते. परंतु त्याच्या वागण्यात काहीच सुधारणा होत नव्हती, असे त्याच्या आईने सांगितले.आईची धडपड अखेर व्यर्थ..कैलासला पोलिसांनी तडीपारीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली होती. त्याला सोडवून आणण्यासाठी त्याच्या आईने कैलासच्या मित्राकडे याचना केली. काही लागेल ते पैसे देते पण माझ्या मुलाला सोडवून आण, असे त्याला सांगितले होते. मात्र, कैलास स्वत:हूनच मित्रांच्या मदतीने जामिनावर सुटून घरी आला. मात्र, आईची ही धडपड अखेर व्यर्थ ठरली.