कऱ्हाड : देशी बनावटीच्या गावठी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून ६० हजार रुपये किमतीचे पिस्तूल व मॅग्झिन जप्त करण्यात आले आहे. शहरातील ईदगाह मैदान परिसरात साई मंदिरासमोर रविवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.मनोज राजेंद्र खांडेकर ऊर्फ एमके (वय २३, रा. जुळेवाडी, ता. कऱ्हाड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशी बनावटीचे गावठी पिस्तूल घेऊन विक्री करण्याच्या उद्देशाने युवक कऱ्हाडमध्ये येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक राजू डांगे यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर राजू डांगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी सापळा लावला. संशयित युवक साई मंदिरासमोर लक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर ईदगाह मैदान परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार त्यांनी रविवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकून युवकाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ साठ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व मॅग्झिन पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणले.पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहायक फौजदार देसाई, संजय जाधव, संतोष पाडळे, आनंदा जाधव, महेश शिंदे, संतोष लोहार यांनी ही कारवाई केली.
देशी बनावटीच्या गावठी पिस्तुलाची विक्री करणाऱ्यास अटक, कऱ्हाडात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 1:17 PM