काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 07:47 AM2021-01-04T07:47:56+5:302021-01-04T08:31:09+5:30
Vilaskaka Undalkar : विलासकाका पाटील उंडाळकर यांनी सलग 35 वर्षे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.
सातारा : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे सातारा येथे सोमवारी पहाटे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज कऱ्हाड तालुक्यातील उंडाळे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विलासकाका उंडाळकर हे सलग ३५ वर्षे कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विकासात विलास काकांचे योगदान मोठे आहे. त्यांनी अनेक सहकारी संस्थांची उभारणी केली. सहकार खात्याचे ते बारा वर्षे मंत्री होते.
विलासकाका उंडाळकर यांनी १९६२ मध्ये जिल्हा बँकेत प्रवेश केल्यानंतर जवळपास १३ वर्षे सक्रिय राजकारणात ते कार्यरत होते, त्यानंतर त्यांनी कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आणि त्यानंतर सलग पस्तीस वर्षे ते या मतदारसंघांमध्ये आमदार होते. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्यात कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला ठेवण्यात विलास काकांना यश आले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विलासराव पाटील-उंडाळकर यांचा पराभव केला. पराभव झाला तरी त्यांनी काँग्रेसच्या विचारधारेशी फारकत घेतली नव्हती.
पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी असलेले मतभेद विसरून काँग्रेस एकसंघ राहावी या हेतूने विलास काकांनी चिरंजीव एडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांना काँग्रेसच्या मूळ प्रवाहासोबत जोडले. काका बाबा गट कित्येक वर्षानंतर एकत्र आले. विलास काका यांच्या निधनाने काँग्रेस पक्षातील एक अनुभवी तारा निखळलेल्याची भावना काँग्रेसजन व्यक्त करत आहेत.