गावपातळीवर चांगले उपचार : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत क्षेत्रात ३० किंवा त्यापेक्षा अधिक खाटांचा विलगीकरण कक्ष उभारल्यास त्याला १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधित प्राप्त निधीतून २५ टक्क्यांंच्या मर्यादेत खर्च करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. यामुळे गावपातळीवरही कोरोना रुग्णांवर चांगले उपचार होणार आहेत.
कोरोना विषाणूच्या संकटकालीन परिस्थितीमध्ये नागरिकांच्या सुरक्षितेसाठी ग्रामविकास विभागामार्फत विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये अर्सेनिक अल्बम ३० हे औषध ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देणे, जिल्हा परिषदांना रुग्णवाहिका पुरवणे, तसेच जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास ५० लाखांचा विमा कवच असे निर्णय घेण्यात आलेले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर एखाद्या ग्रामपंचायतीने कोरोना रुग्णांसाठी ग्रामपंचायत क्षेत्रात ३० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांचे विलगीकरण कक्षाची मागणी केल्यास तेथे ते उभारण्यात येणार आहे तसेच विलगीकरण कक्षास १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधित प्राप्त निधीतून खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार निधीच्या २५ टक्के मर्यादित खर्च करता येणार आहे.
यामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत क्षेत्रात विलगीकरण कक्ष उभारणीबाबत योग्य नियोजन करावे, असे सुचविण्यात आले आहे तसेच त्याबाबत आढावा घेऊन संबंधित ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाच्या आबंधित निधी खर्च करण्यास परवानगी द्यावी, असेही ग्रामविकास विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरही रुग्णांना चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
.........................................................................