पुसेगाव : जलसंधारण कार्यक्रम यशस्वीपणे राबवून राज्यात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या जाखणगाव येथील जय भैरवनाथ संघटना व आजी-माजी सैनिकांनी गावातील ‘कोरोनाबाधितांसाठी कायपण’ लढा उभारला आहे. गावासमोर उपक्रम मांडताच नागरिकांनीही सर्व मतभेद बाजूला ठेवून आलेल्या संकटाला तोंड एकजुटीने देण्याचे स्वयंस्फूर्तीने ठरविले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र जाणवू लागला असून, प्रत्येक गावात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जाखणगाव येथील जय भैरवनाथ संघटना व आजी माजी संघटनेच्या जागरूक व सुज्ञ नागरिकांनी सदस्यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी विलगीकरण केंद्र सुरू करणे, बाधितांसाठी लोकवर्गणीद्वारे सर्वतोपरी मदत करणे, संपूर्ण गाव सॅनिटाइझ करणे, अगदी शौचालयाची दुरुस्तीसह नवीन शौचालयाची उभारणी या संघटनेचे सदस्य करीत आहेत. आरोग्यसंबंधी उपाययोजना राबवून केेलेले हे काम परिसरातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
जवळपास अडीचशे सदस्य असलेल्या जय भैरवनाथ संघटनेतील अनेक सदस्य हे लष्कारात व पोलीस दलात कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून गावामध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले. येथील भैरवनाथ संघटनेतील युवकांनी आमदार महेश शिंदे यांच्या कामातून प्रेरणा घेत गावाचे कोरोनापासून रक्षण करण्याचा निर्धार केला.
एकजुटीने कोविडमुक्त गाव मोहीम राबविण्यासाठी गावपातळीवर आराखडा तयार करण्यात आला. जनजागृती, घरोघरी जाऊन कुटुंबाची तपासणी, सौम्य लक्षणे आढळल्यास त्वरित विलगीकरणात ठेवून वैद्यकीय उपचार सुरू करण्यात येत आहेत. जय भैरवनाथ संघटनेने लोकवर्गणी गोळा करून येथील प्राथमिक शाळेत व हायस्कूलमध्ये उपाचार घेत असलेल्या बाधितांसाठी गरम पाण्याची सोय, नाश्ता पुरविणे, विलगीकरण कक्षातील खराब झालेल्या स्वच्छतागृहाची दुरुस्ती करणे, वरचेवर संपूर्ण गाव सॅनिटाइझ करणे याबरोबरच येथील खासगी वैद्यकीय व्यवसाय करणारे डाॅ. कोळेकर हे बाधितांची वरचेवर तपासणी करून मोलाचे सहकार्य करीत आहेत.
चौकट :
गाव कोरोनापासून वाचविण्यासाठी आपल्यालाच काही तरी केले पाहिजे, या मित्रांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कल्पनेला काही तासांतच मूर्त रूप मिळाले. सद्य:स्थितीत भरपूर निधी गोळा झाला आता शक्य तितक्या लवकर कोरोनाला रोखणे व जे बाधित आहेत ते लवकरात लवकर आजारातून बरे करणे हेच आमच्या डोळ्यांसमोर मुख्य उद्दिष्ट आहे, अशी माहिती जवान पिंटू पाटील यांनी दिली.
फोटो २०पुसेगाव-कोरोना
जाखणगाव येथे कोरोना बाधितांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी जय भैरवनाथ संघटना व आजी-माजी सैनिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छतागृहाची टाकी बसविली. (छाया : केेशव जाधव)