तरडगाव : फलटण तालुक्यातील पाडेगाव ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र, पाडेगाव यांच्या देखरेखेखाली आपत्ती व्यवस्थापन समिती, गावातील सर्व देवस्थान समिती यांच्या सहकार्याने प्राथमिक शाळा, तुकाईनगर या ठिकाणी सर्व सोयींनीयुक्त असे विलगीकरण कक्ष नुकतेच सुरू करण्यात आले आहेत.
पाडेगाव परिसरात अनेक वाड्या-वस्त्या येतात. या सर्व ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे ही कोरोना साखळी तोडण्यासाठी शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करीत ‘माझा गाव, माझी जबाबदारी’ याप्रमाणे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे बनले आहे. त्यानुसार येथे विलगीकरणाची सर्वांच्या सहकार्याने उभारणी करण्यात आली आहे. तसेच गोळा झालेल्या लोकवर्गणीच्या रकमेतून डॉक्टरांच्या सल्ल्याने प्राथमिक उपचारासाठी काही प्रमाणात औषध साठा उपलब्ध करण्यात आला आहे.
या कक्षात सध्या अकरा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार पुढे ती वाढविण्यात येणार आहे. या कक्षातील रुग्णाच्या आरोग्याची दैनंदिन तपासणी उपकेंद्राचे डॉक्टर, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत केली जात आहे. काही कोरोनाबाधित हे घरी क्वारंटाईन आहेत; तर स्वतंत्र राहण्याची सोय नसलेल्या अशा व्यक्तींनी कुटुंबाच्या व गावाच्या भल्यापोटी कोरोना संसर्ग इतरत्र फैलावू नये, यासाठी स्थापन केलेल्या विलगीकरण कक्षामध्ये येऊन होम क्वाॅरंटाईन व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.