ओगलेवाडी : ‘कोरोना काळात साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरण कक्ष हा मैलाचा दगड ठरणार आहे. हजारमाची ग्रामपंचायत आणि लाईफ फाऊंडेशन यांनी सहकार्यातून तयार केलेला विलगीकरण कक्ष हा जीवनरक्षक कक्ष बनेल,’ असे प्रतिपादन गजानन हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
आत्माराम शाळा येथे स्थापन केलेल्या विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच विद्या घबाडे, उपसरपंच प्रशांत यादव उपस्थित होते.
हजारमाची आणि ओगलेवाडी बाजारपेठ या परिसरात कोरोना रुग्ण वाढत आहेत. लहान घरे आणि गर्दीचा परिसर यामुळे संपर्क वाढून साथ वाढत आहे. विलगीकरणाची सोय झाल्यास रुग्णसंख्येला आळा बसेल म्हणून येथील आत्माराम शाळेत विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय हजारमाची ग्रामपंचायतीने घेतला.
या विलगीकरण कक्षाला मदतीचा हातही द्यायला सुरुवात झाली आहे. आमदार रोहीत पवार विचार मंच व गांधी फाऊंडेशन यांच्याकडून २५ चादरी बेडशीट आणि उशा देण्यात आल्या, तर धीरज गांधी आणि समीर कुडची यांनी साहित्य कक्षाकडे सुपूर्द केले. या कक्षामुळे अनेक गरजू रुग्णांची सोय होणार आहे. कोरोना रुग्ण वाढीला आला बसणार आहे. ग्रामपंचायतीच्या या कामाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
यावेळी डॉ. आनंद पवार, मुख्याध्यापिका पी. ए. तारू, मनीषा जांभळे, शरद कदम, जगन्नाथ काळे, अवधूत डुबल, पितांबर गुरव, दीपक लिमकर, पराग रामुगडे, ग्रामसेवक व्ही. एन. चिंचकर, सर्जेराव पानवळ उपस्थित होते.