सातारा : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाने दडी मारली असून, पश्चिमेकडेही तुरळक स्वरुपात पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. त्यातच जुलैमधील अतिवृष्टीकाळात मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने ही धरणे भरण्यास सप्टेंबर महिना उजाडणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तर सध्या प्रमुख ६ धरणांत ८५ टक्क्यांवर पाणीसाठा आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागात एक महिन्यापूर्वी तुफान वृष्टी झाली होती. यामुळे शेतीचे नुकसान झाले तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयना धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाणी आले होते. कोयना धरणाच्या इतिहासातील हा एक विक्रम ठरला. तर कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी यासारख्या धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करुन पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यात आली.
गेल्या काही दिवसात पाऊस कमी-कमी होत गेला. त्याचबरोबर धरणांत येणाऱ्या पाण्याची आवकही मंदावली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने धरणातून विसर्ग बंद करण्यात आला. कोयना धरणातून पाणी सोडणेही थांबविण्यात आले आहे. सध्या कोयना धरणात ९४ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. टक्केवारीत हे प्रमाण ८९.४० आहे तर धोम धरणात ११.८०, कण्हेर ८.८४ आणि उरमोडी धरणात ८.४१ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. तर टक्केवारीत हे प्रमाण धोम ८७.४०, कण्हेर ८७.५६ आणि उरमोडी धरणात ८४.३७ टक्के साठा आहे. तारळी धरणातही ९०.५२ टक्के पाणीसाठा झालेला आहे.
चौकट :
नवजाला ४२ मिलिमीटर पाऊस...
सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला पावसाची नोंद झाली नाही. मात्र, यावर्षी जून महिन्यापासून कोयनेला ३,५७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला सकाळपर्यंत ४२ तर आतापर्यंत ४,६७९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ४ तर यावर्षी जूनपासून ४,८११ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.
...............................................................