रामापूर : कऱ्हाड-चिपळूण या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून लहान-मोठे शेकडो अपघात झाले आहेत. चौपदरीकरण रस्त्यांचे काम पूर्ण होण्यापूर्वीच अपघातांची मालिका सुरू आहे. आता तर रस्त्याचे काम पूूर्णतः थांबले आहे. या अपूर्ण कामामुुळे जर मोठा अपघात झाला, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न रस्त्यालगत असणारे ग्रामस्थ आणि या रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी विचारू लागले आहेत.
कऱ्हाड-चिपळूण हा मार्ग एकूण ९० किलोमीटर लांबीचा आहे. कोयना प्रकल्पाच्या निर्मितीवेळी हा रस्ता तयार करण्यात आला होता. या मार्गाला कोयना धरण प्रकल्पाच्या निर्मितीमुळे अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे . या मार्गावरची वाढती वाहने आणि विकासाकरिता या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतर होऊन याचे रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. या रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले; पण काही दिवसांमध्येच या मार्गाचे काम पूर्णतः बंद आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या चारचाकी आणि दुचाकीस्वारांन खूपच त्रास सहन करावा लागतो आहे.
या रस्त्याच्या रूंदीकरणामध्ये भर घालण्यासाठी मातीचा मोठ्याप्रमाणात वापर केला गेला आहे. यामुळे यावरून मोठे वाहन गेल्यानंतर मोठया प्रमाणात धुरळा उडतो. त्यामुळे मागील वाहनचालकाला पुढचे काहीच दिसत नाही. परिणामी लहान-मोठे अपघात होऊन अपघातांची मालिकाच सुरू आहे. कऱ्हाड-चिपळूण या मार्गावर प्रवास करणारे नागरिक, प्रवासी हा महामार्ग पूर्ण कधी होणार? असा प्रश्न विचारत आहेत.