आॅनलाईन लोकमतपसरणी : मुसळधार पावसात दरड कोसळण्याच्या मालिकेमुळे वाई-पाचगणी मार्गावरील पसरणी घाट चर्चेत येतो. आता दुसऱ्याच कारणाने तो चर्चेत आहे. घाटात वणवा लावण्याची मालिका सुरूच असून, त्यामध्ये दुर्मीळ वनसंपत्ती, प्राणी, पक्ष्यांचा बळी जात आहे. वनविभाग मात्र खासगी जागेत वणवा लागल्याचे कारण सांगून बघ्याची भूमिका घेत आहे. पसरणी घाटात प्रचंड मोठा वणवा लावला होता. सलग सुट्या असल्याने घाटात पर्यटकांच्या वाहनांची प्रचंड गर्दी होती. खासगी शेत मालकाने शेताच्या बांधाला लावलेल्या आगीने पाहता पाहता मोठे क्षेत्र व्यापले. यामध्ये वनविभागाचे क्षेत्र जळून खाक झाले. हा लावण्यात आलेला वणवा पर्यावरणप्रेमींनी वनविभागाच्या मदतीने तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर विझविण्यात यश मिळविले. चार ते पाच हेक्टर जमिनीवरील परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. त्या वणव्यात कित्येक झाडे-झुडपे आगीच्या कवेत येऊन जळून खाक झाली. लाखो रुपये देऊनही पर्यावरणाचे नुकसान भरून निघणार नाही. अशी अवस्था या परिसराची झाली होती.शेतकरी गैरसमजुतीतून वणवा लावत असल्याने अंधश्रद्धेपोटी पर्यावरण वेठीस धरण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यावर संबंधित विभागाने सखोल प्रबोधन व मार्गदर्शन करण्याची नितांत गरज असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यावेळी खासगी क्षेत्रातील वणवा लावणाऱ्या मालकावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत होती. वनविभागाचे वनक्षेत्रपाल पी. डी. बुधनवर यांनी ही लोकांच्या मागणीचा विचार करून संबंधितांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. दरवर्षी वणवा लागण्याच्या घटनेत वाढच होताना दिसत आहे. ही अतिशय दुदैर्वी बाब असून, यावर उपाय शोधून पर्याय निवडावा व पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळावे, अशी काहीशी अपेक्षा स्थानिक नागरिकांमधून करण्यात येत आहे.कारवाईअभावी धाडस वाढलेवाई तालुक्यातील वनविभाग हा वणवा लागलेला भूखंड किंवा परिसर, खासगी मालकीचा आहे हे कारण पुढे करत दोषींवर कारवाई करण्यासाठी चालढकल करताना दिसत आहे. डोंगर रांगातील शेतकरी स्वत:च्या शेतीच्या बांधाला वणवा लावून नामानिराळ राहतो. वनविभाग वणवा लागलेली जागा खासगी असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे वाई तालुक्यात वणवा लावणाऱ्यांचे धाडस वाढत आहे. डोंगर भकास होण्याची वेळतसे झाल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. जागा कोणाची आहे, हे न पाहता वणवा लावणाऱ्यावर कायदेशीर कडक कारवाई करा, अशी मागणी वन्यप्रेमींनी वनविभागाकडे केली आहे. तालुक्यातील सर्व डोंगररांगा जळून उजाड झाल्यानंतर संबंधित विभागाला जाग येणार असेल तर ही अतिशय गंभीर बाब असून, त्वरित संबंधित दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून करण्यात येत आहे.
पसरणी घाटात वणव्यांची मालिका!
By admin | Published: March 15, 2017 3:44 PM