सातारा : ‘आरोपींवर कोणतीही कारवाई न करता याउलट त्यातील आरोपींना शाही वागणूक देऊन माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करून घेतला. संबधित पोलीस निरीक्षक महाराष्ट्र शासनाचा पगार घेत असून, प्रत्यक्ष चाकरी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची करीत आहेत,’ असा आरोप ‘रासप’चे मारुती जानकर यांनी पत्रकार परिषदेत केला.जानकर म्हणाले, ‘१४ आॅगस्टला शहर पोलिसांनी मला ताब्यात घेतले. त्यावेळी बाळू खंदारे, महेंद्र तपासे व इतर कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात मला मारहाण केली. पोलिसांसमक्ष मारहाण होऊनही मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. परंतु मुठाणे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दबावापोटी गुन्हा दाखल केला नाही,’ असा आरोपही जानकर यांनी केला.जानकर पुढे म्हणाले, ‘पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे, बाळू खंदारे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील मोबाइल कॉल डिटेल्स समोर आले तर यातील षड्यंत्र जनतेसमोर येईल. आमदारांच्या आशीर्वादाने खंदारे, तपासे हे मोठे झाले असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई करायला मुठाणे घाबरत आहेत. उलट मुठाणे यांनी माझ्याविरूद्ध खोटा गुन्हा दाखल करून घेतला आहे.’ (प्रतिनिधी)
साताऱ्यात पोलीस करतात आमदारांची चाकरी
By admin | Published: September 10, 2014 10:53 PM