मलकापूर : ‘कोरोनाच्या महासंकटाचा सामना करताना केंद्र किंवा राज्य सरकारच्या मर्यादा पुढे आल्या आहेत. त्यामुळे आरोग्य व शिक्षण क्षेत्राबाबत केवळ सरकारवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर भारतासाठी समाजातील सामाजिक संस्था, खासगी कंपन्या, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा. त्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
येथील कृष्णा वैद्यकीय संशोधन केंद्रात कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, प्रशांत परिचारक, डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, विक्रम पावसकर, आनंदराव पाटील, मकरंद देशपांडे, प्रवीण शिणगारे यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री गडकरी म्हणाले, ‘कोरोनाकाळाची आठवण काढली तरी डोळ्यांत पाणी येतं. कोरोना सुरू झाला तेव्हा सर्वच सुविधांचा तुटवडा होता. अशा कठीण परिस्थितीत अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून मदत केली. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांत सरकारबरोबरच समाजातील इतर घटकांचे योगदान आवश्यक आहे. देशात आता तातडीने ६०० वैद्यकीय महाविद्यालयांसह २०० सुपरस्पेशालिटी रुग्णालये व शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्था गरजेच्या आहेत. दिवंगत वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मेडिकल आणि इंजिनिअरिंग महाविद्यालये उभी केली. लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने उभे राहिलेल्या या संस्थांचे कोरोनाकाळात मोठे योगदान आहे.’
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘कोरोनाचे पहिले उपचार केंद्र कृष्णा रुग्णालयात सुरू केले. प्रथम ६० व नंतर ४०० बेडची संख्या वाढविली. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड वाढविले. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू दिली नाही. कोरोनाबाधित ३६३ गरोदर मातांवर उपचार केले. यांतील तीन वगळता सर्व सुखरूप घरी परतल्या.’
यावेळी कोरोनाकाळात काम केलेले डॉक्टर्स, कर्मचारी यांचा पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. अतुल भोसले यांनी आभार मानले.
(चौकट)
इथेनॉल निर्मितीवर भर द्या, मी परवाने देतो!
महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी परिस्थितीनुसार बदलले पाहिजे. पेट्रोल, डिझेलची भविष्यातील स्थिती लक्षात घेता आणि होणारे साखर उत्पादन व मिळणारा दर विचारात घेता इथेनॉल निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे. जे परावनगी मागतील त्यांना परवानग्या मी मिळवून देतो, असं आश्वासन त्यांनी दिलं.
फोटो..
कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेले कृष्णा रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी यांचा पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. (छाया माणिक डोंगरे)
250921\img_20210925_114154.jpg
फोटो कॕप्शन
कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेले कृष्णा रूग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी यांचा पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. (छाया माणिक डोंगरे)