वाई : ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असणाऱ्या वाई शहराच्या नावलौकिकात भर टाकणारी व जिल्ह्यात आदर्शवत ठरणारी नगरपालिकेची प्रशासकीय इमारत वाईकरांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. सुमारे सात कोटी रुपये खर्चाच्या या इमारतीत नागरिकांसाठी सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेत व लवकर होणार आहेत.वाई शहराची लोकसंख्या व वाढ झपाट्याने होत आहे. त्यामुळे सुसज्ज व सर्व सुविधायुक्त अशी नगरपालिकेच्या इमारतीची आवश्यकता होती. नवीन प्रशासकीय इमारतीला २००९ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली. त्यानंतर वाई शहराच्या नावलौकिकात भर टाकणारी भव्य इमारत उभी राहिली आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नगरपालिकेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची कार्यालये तसेच अकाऊंट, पाणीपुरवठा विभाग, नागरी सुविधा केंद्र, आरोग्य विभाग असणार आहे. तर दुसऱ्या मजल्यावर सर्व विभागाच्या सभापतीसाठी स्वतंत्र कक्ष आहेत. बांधकाम, नगररचना विभाग, आस्थापना विभाग, विरोधी पक्ष कक्ष असे स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. तिसऱ्या मजल्यावर भव्य सभागृह, कॉन्फरन्स हॉल, गेस्ट रूम असून, यात वेब कॅमेरा, सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. नागरिकांसाठी अद्ययावत लिफ्टची सोयही करण्यात आली आहे. पालिकेची भव्य इमारत वाईकरांच्या सेवेसाठी आता सज्ज झाली आहे. (प्रतिनिधी) वाई, खंडाळा, महाबळेश्वर या सर्वात भिन्न भौगोलिक परिस्थितीच्या मतदार संघाचे नेतृत्व करण्याची मला दोन वेळा संधी देण्यात वाईकर नागरिकांचा मोठा वाटा आहे. ही इमारत उभी करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांच्या सुविधा व सेवेसाठी या इमारतीचा लवकरच ‘लोकार्पण’ सोहळा करता येईल. -आमदार मकरंद पाटीलवाई नगरपालिकेच्या इतिहासात सर्वप्रथम नगरपालिका इमारत, वैकुंठ स्मशानभूमी असे अनेक कोट्यवधींचे भव्य प्रकल्प आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नाने साकारले आहेत. या प्रकल्पाचा कोणताही आर्थिक बोजा नगरपालिकेवर नाही. याचा आम्हाला अभिमान आहे.- भूषण गायकवाड, नगराध्यक्ष वाई शहराची लोकसंख्या वाढत आहे. तसेच वाढणारे शहरीकरण लक्षात घेऊन पालिका ‘ब’ वर्ग झाली तरीही सर्व कक्ष व कार्यालये एकाच छताखाली असावेत, या हेतूने नूतन इमारत साकारली आहे.-आशा राऊत, मुख्याधिकारी
एकाच छताखाली वाईकरांना सेवा !
By admin | Published: September 03, 2015 10:13 PM