सातारा : जिल्ह्यातील लसीकरण हे निवडणुकीप्रमाणे बूथनिहाय लसीकरण केंद्रे चालू करावे, अशी मागणी संकल्प इंजिनीअरिंग संस्थेचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत. त्यामुळे अनेक लोकांना जीवदेखील गमवावा लागला आहे. अशा प्रसंगी लसीकरण वाढविणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाळा आहे. आता बऱ्याच शाळा बंद आहेत. आणि अजून दोन महिने शाळा बंद राहतील, अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे या सर्व शाळांचा आपण लसीकरण केंद्रे म्हणून वापर करू शकतो. त्याच प्रमाणे आपण फ्रंटलाइन वर्करचे दोन डोस लसीकरण पूर्ण केले आहे. त्या सरकारी कर्मचाऱ्यांचा आपण लसीकरण केंद्रे चालविण्यासाठी वापर करू शकतो. तसेच ज्या दुर्गम ठिकाणांवरून वयस्कर लोक येऊ शकत नाहीत तिथे आपण जाऊन लसीकरण करू शकतो. यासाठी आपणास आमच्यासारख्या सामाजिक संस्थादेखील मदत करतील आणि १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल.
जिल्हाधिकारी, प्रशासन व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राज्यात लसीकरणात सातारा जिल्हा पहिला क्रमांक पटकावेल, असा विश्वासदेखील कुलकर्णी यांनी या निवेदनात व्यक्त केला आहे.