सातारा : अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत सिंचन प्रकल्पांचा लाभ पोहचावा, तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मार्गी लागाव्यात, या हेतूने कृष्णा खोरे महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण परिषदेमध्ये ४५० तक्रारींपैकी १८५ तक्रारींचा निपटारा जागच्या जागी करण्यात आला. ही परिषद कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे लाभधारक प्रकल्पग्रस्त तसेच सिंचन प्रकल्पातून वंचित गावे अथवा शेतकऱ्यांचा समस्या. तक्रारी व अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी साताऱ्यात या तक्रार निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेमध्ये जवळपास ४५० तक्रारी अर्ज दाखल झाले. यामध्ये प्रामुख्याने पुनर्वसन तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, सिंचन योजनेच्या पाणीवाटपानुसार पाणी आवर्तनाचे प्रश्न, वंचित भागाकडून पाणी उपसा सिंचन योजना मागणी, पाणी परवाना मागणी, सिंचन योना पूर्णत्वाचे प्रश्न, सिंचन लांभधारकांचे प्रश्न, तसेच पुनर्वसन मोबदला, उदरनिर्वाह भत्ता यासंदर्भातील तक्रारी अर्जांचा समावेश होता.यातील १८५ अर्ज हे त्वरीत उपाययोजना करून कार्यवाही करण्याचे आदेश देऊन निकाली काढण्यात आले. कवठे, केंजळ, धोम-बलकवडी, जिहे, कठापूर, तारळी प्रकल्प तसेच धनगरवाडी, हणबरवाडी, टेंभू, उरमोडी या सिंचन योजनांवरील तक्रारीवर तक्रार कार्यवाही करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला.अधिकाऱ्यांपुढे थेट प्रश्न मांडून तसेच जागेवरच निराकरण करता आल्याने शेतकऱ्यांमधून या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त होत आहे.यावेळी बानुगडे-पाटील म्हणाले, कृष्णा खोरे महामंडळाला अधिकाधिक लोकाभिमूख करण्याचा प्रयत्न असून, प्रकल्पधारकांना वंचितांना आपल्या समस्या मांडता याव्यात, यासाठी ही परिषद आयोजित केली.
अनेक शेतकऱ्यांना आपली समस्या नेमकी कुठे मांडावी हा प्रश्न असतो. मांडली गेली तरी त्याचा पाठपुरावा करण्यात बराच वेळ जातो. त्यांचा हा वेळ वाचावा, यासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची होती. यामध्ये महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे योगदान मोठे आहे.शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने, डी.एम. बावळेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, अजित यादव, तालुका प्रमुख किरण भोसले, सुनील पाटील आदी यावेळी उपस्थित होते.