सातारा : पालघर जिल्ह्यातील वाणगाव येथील महावितरणच्या वीज बिलाच्या पैशाच्या अपहार करून पसार झालेल्या संशयिताला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली.सचिन रामचंद्र साळुंखे (रा. कारंडवाडी, ता.सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, वाणगाव येथे महावितरणच्या वीज बिलांच्या पैशाचा अपहार २०१७ ला साळुंखे याने केला होता. त्यानंतर त्याच्यावर वाणगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर साळुंखे फरार झाल्याने पालघर पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, साळुंखे पोलिसांना सापडत नव्हता. दरम्यान, कारंडवाडी, ता.सातारा येथे तो येणार असल्याची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या.
साळुंखेला कारंडवाडी येथून अटक केल्यानंतर त्याला सातारा तालुका पोलिसांनी वाणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर पालघर जिल्ह्यात फसवणुकीचे पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, रमेश चव्हाण, संदीप कुंभार, सयाजी काळभोर यांनी केली.