सातारा : ‘पुणे-बंगळूर महामार्गावर तीन वर्षांत तीन हजार लोकांना अपघाताला सामोरे जावे झाले. एका आयुष्याचा नाही तर तीन हजार आयुष्यांच्या प्रश्न निर्माण झाला असतानाही तुम्हाला गांभीर्य नाही. टोल घेताय ना...मग रस्त्याच्या दुरुस्त्याही करा,’ असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकारी व संबंधित ठेकेदारांना दिला. दरम्यान, या इशाऱ्यानंतर सात दिवसांत कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिले. महामार्गावर पारगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीत भरधाव कंटेनरने चिरडल्याने आठ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातानंतर राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना करून महामार्गावरील त्रुटींबाबत बैठक घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी महामार्ग प्राधिकरणासह विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक आपल्या दालनात बोलावली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, प्रवक्ते विजयकुमार काटवटे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार होणाऱ्या अपघातांच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला अपेक्षित असलेल्या गोष्टींची मांडणी या बैठकीत केली. महामार्गावर एसटीची वाट पाहत थांबलेल्या प्रवाशांवर रविवारी काळाने घाला घातला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, ‘महामार्गावर एसटी बसेस उभी न करता ती सेवा रस्त्यावर उभी करावी, त्यासाठी सेवा रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात यावे. गरज असेल त्या ठिकाणी फूटपाथची व्यवस्था करा. पिक अप शेडची उभारणी केल्यास लोकांना त्याठिकाणी सुरक्षितपणे थांबता येईल. गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते आमच्याकडे लेखी तक्रार करत आहेत. याबाबत वेळोवेळी सूचना करूनही महामार्गावर सुधारणा केल्या जात नाहीत. काही दिवसांपूर्वी अपघातानंतर महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. आता तरी वेगाने दुरुस्त्या करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा.’ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, ‘महामार्गावर अनेक अपघात होतात. पोलीस व नागरिक धावून जातात व लोकांचे जीव वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत असतात; परंतु महामार्ग प्राधिकरणाचे अपेक्षित सहकार्य मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. जिल्हा हद्दीत अनेक ठिकाणी रस्त्यावर रिफ्लेक्टर नाहीत, विजेची सुविधा नाही. या किरकोळ बाबींची सुधारणाही करता येत नाही.’ या बैठकीला खंडाळा तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते. (प्रतिनिधी) ही शेवटची संधी महामार्गावरील गैरसोयींबाबत राज्य शासन गांभीर्याने विचार करत आहे. मुख्यमंत्र्यांनी दि. २० नोव्हेंबर रोजी मुंबईत बैठक आयोजित केली आहे. महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदारांना सात दिवसांची मुदत देत आहोत. ही शेवटीची संधी आहे, हे ओळखून महार्गावरील गैरसोयी दूर करा, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. पारगावसह अनेक ठिकाणी सेवा रस्त्यावर बसथांबे महामार्गावर अपघात होत असल्याने सेवा रस्त्यांवरच बस थांबविण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत केल्या आहेत.
सात दिवसांत महामार्गाची कामे सुरू होणार हायवे अपघातानंतर बैठक :
By admin | Published: November 17, 2014 10:48 PM