सातारा : कर्नाटक राज्याच्या बसमध्ये हाडसदृश पदार्थांची सात पोती आढळल्याने बुधवारी खळबळ उडाली. सातारा शहर पोलिसांनी ही पोती जप्त केली असून, प्रयोगशाळेतील तपासणीनंतर यात काही आक्षेपार्ह आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्याच्या गोकाक-मुंबई बसमधून हाडे नेली जात आहेत, अशी खबर सातारा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोवई नाका परिसरात लक्ष ठेवून ही बस थांबविण्यात आली. गाडीची तपासणी केली असता आत सात पोती आढळून आली. त्यात हाडसदृश पदार्थ होता. ही पोती मुंबईला नेली जात असल्याचे चालक-वाहकाने सांगितले. ‘हा कुत्र्यांचा खाद्यपदार्थ आहे,’ असेही सांगितले. तथापि, पोलिसांनी बस पोलीस ठाण्याकडे आणली. संशयावरून ही पोती पोलिसांनी जप्त केली असून, पुढील तपासणीसाठी ती प्रयोगशाळेत पाठविली जाणार आहेत. आक्षेपार्ह असे काही आढळल्यास याप्रकरणी कारवाई करण्यात येईल; मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. बसमध्ये पोती सापडल्याच्या बातमीने परिसरात चर्चेला उधाण आले होते. ‘या पोत्यांचे संबंधिताने भाडे भरले असून, रीतसर पावती तयार केली आहे,’ असे चालक-वाहकाने पोलिसांना सांगितले. मात्र, ही पोती बसमधून मुंबईकडे का पाठविण्यात येत होती, या शंकेने चर्चा वाढतच गेली. (प्रतिनिधी)
बसमध्ये सापडली हाडांची सात पोती
By admin | Published: January 13, 2016 10:50 PM