लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : शहरातील कृष्णा नाक्यावर असलेली उज्जीवन बँकेची शाखा फोडून चोरट्यांनी सात लाखांची रोकड असलेली तिजोरीच लंपास केली. ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे शहरात खळबळ उडाली. बँकेचे शाखा व्यवस्थापक पंकजकुमार प्रकाश ताटे यांनी कºहाड शहर पोलिसांत फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कृष्णा नाक्यावर ‘सावित्री कॉर्नर’ इमारत असून, त्याठिकाणी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेची शाखा आहे. या शाखेमध्ये व्यवस्थापक पंकजकुमार ताटे यांच्यासह २५ कर्मचारी कार्यरत आहेत. शाखा सकाळी साडेआठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू असते. या शाखेमध्ये पहारेकरी किंवा शिपाई नाही. कॅशिअर किंवा व्यवस्थापक स्वत: बँकेची शाखा बंद झाल्यानंतर सायंकाळी कुलूप लावून जातात. बँकेतील कर्मचारी गुरुवारी, दि. २४ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काम आटोपून आपापल्या घरी गेले. बँकेला तीन दिवस सलग सुटी असल्याने व्यवस्थापक पंकजकुमार ताटे, सहायक व्यवस्थापक अमित कांबळे, स्वप्नील शिंकर, प्रशांत यादव, तुषार देशमुख, दीपक पवार हे बँक बंद करण्यासाठी थांबले होते. बँकेतून बाहेर आल्यानंतर कॅशिअर सूरज गंगाराम गोले यांनी बँक कुलूप लावून बंद केली. त्यानंतर तीन दिवस सुटी असल्याने बँकेकडे कोणीच फिरकले नाही.व्यवस्थापक पंकजकुमार ताटे सोमवारी सकाळी शहरातील कोल्हापूर नाका येथे असताना त्यांना बँकेचे फिल्ड आॅफिसर अनिल पवार यांचा फोन आला. बँकेचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांनी ताटे यांना सांगितले. त्यानंतर व्यवस्थापक ताटे हे तातडीने बँकेत गेले. त्यावेळी बँकेकडे जाणाºया जिन्याच्या शटरला कुलूप नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच बँकेचा मुख्य दरवाजा बाहेरील लोखंडी दरवाजा उघडा होता व आतील लाकडी मुख्य दरवाजाचे कुलूप तुटल्याचे व भिंतीतील कुलूप कशाने तरी उचकटविल्याचेही दिसून येत होते. कॅशिअर रुमचे कुलूप तुटलेले व रुममधील पैसे ठेवलेली तिजोरी जाग्यावर नसल्याचे पाहिल्यानंतर बँकेत चोरी झाल्याचे समोर आले. याबाबत तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.त्यानंतर पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलिस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांच्यासह गुन्हे शाखेचे कर्मचारी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता चोरट्यांनी ७ लाख ७ हजारांची रोकड असलेली तिजोरीच चोरून नेल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. याबाबतची नोंद कºहाड शहर पोलिसांत झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक हणुमंत गायकवाड तपास करीत आहेत.श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारणचोरीची घटना उघड झाल्यानंतर कºहाड शहर पोलिसांनी ठसेतज्ज्ञ तसेच श्वानपथकाला पाचारण केले. ठसेतज्ज्ञांनी ठसे संकलित केले. तसेच श्वान घटनास्थळापासून काही अंतरावर जाऊन घुटमळले. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी सोमवारी सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
तिजोरीसह सात लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:33 PM