सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये गत दोन वर्षांपूर्वी सर्व मशीन नवीन आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय टळली आहे. सिटीस्कॅन मशीनसह सात मशीन रुग्णालयात सुस्थितीत आहेत. या मशीनद्वारे रोज ओपीडीत येणाऱ्या रुग्णांची तपासणी केली जाते. सहाशे रुग्ण रोज तपासणी करून घेत आहेत.
सिटीस्कॅन, एक्स-रे मशीन, डेंटल चेअर, सोनोग्राफी, इसीजी मशीन रुग्णालयाला नवीन उपलब्ध झाल्या आहेत. गत तीन वर्षांपूर्वी रुग्णांची या मशीन नसल्यामुळे ससेहोलपट होत होती. मात्र, आता या मशीनमुळे सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड पूर्णपणे थांबली असल्याचे दिसून येत आहे.
एमआरआय मशीन लवकरच..
जिल्हा शासकीय रुग्णालयात सर्व मशीन नवीन आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत नाही. अजून अत्याधुनिक मशीन येत्या काही महिन्यात रुग्णालयाला मिळणार आहेत. एमआरआय मशीन नाही, हे मशीन मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- डाॅ. सुभाष चव्हाण
जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा
पण मटेरियल नाही...
जिल्हा शासकीय रुग्णालयात अनेकजण दात आणि दाडेची तक्रार घेऊन येतात. त्यावेळी रुग्णांना अनेक वेगवेगळी कारणे सांगितली जातात. रुट कॅनाॅलसाठी लागणारे मटेरियल नाही, असे सांगितले जाते. अशा प्रकारचे सिव्हिलमध्ये येणारे रुग्ण सर्वाधिक आहे. मग या रुग्णांना नाइलाजास्तव खासगी रुग्णालयामध्ये जावे लागते. केवळ दात काढून दिला जातो, अस रुग्ण सांगतात.
जिल्हा रुग्णालयामधील सद्य:स्थिती
सिव्हिलमध्ये सध्या सात मशीन उपलब्ध आहेत. या मशीनच्या आधारेच सर्वसामान्य रुग्णांची तपासणी केली जात आहे. कोरोनामुळे अद्याप रुग्ण तपासणीसाठी येत नाहीत. मात्र तरीसुद्धा दिवसाला सहाशे रुग्णांची तपासणी केली जात आहे. एमआरआय मशीन नसल्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे पाहायला मिळतेय.
शासकीय मेडिकल कॉलेजमधील स्थिती
जिल्ह्यात शासकीय मेडिकल काॅलेजची अद्याप उभारणी झालेली नाही. या काॅलेजच्या उभारणीसाठी कृष्णानगर येथील जमीन उपलब्ध झाली असून, येत्या काही दिवसांत काॅलेजच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे. मेडिकल काॅलेज पूर्ण झाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयातील आरोग्यसेवेचा ताण पूर्णपणे कमी होणार आहे.
रुग्णांचे होताहेत हाल
जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. अपघातात गंभीर डोक्याला मार लागलेल्या व्यक्तीचे एमआरआय करणे गरजेचे असते. रुग्णालयात हे मशीन नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. दोन दिवसांपूर्वी पुतण्याचा अपघात झाला. त्यावेळी आम्हाला एमआरआयसाठी खासगी हाॅस्पिटलमध्ये जावे लागले.
- श्रीधर कदम
- कोरेगाव
सिव्हिलमध्ये सिटीस्कॅन मशीन आहे. मात्र, काही वेळेला व्यवस्थित रिपोर्ट दिसत नाही. अशी काही डाॅक्टरांकडून कारणे दिली जातात. त्यामुळे विनाकारण रुग्णांना पुन्हा खासगी ठिकाणी जाऊन सिटीस्कॅन करावे लागते. बाहेर पाच ते आठ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे सिव्हिलमध्ये सिटीस्कॅन तंत्रज्ञान असलेल्यांवर अंकुश असायला हवा.
- सदाशिव घोलप
- सातारा