सातारा: रस्त्यामध्ये उभा केलेला सिलिंडरने भरलेला टेम्पो अचानक रस्त्यावरून धावल्याने साताऱ्यात प्रचंड खळबळ उडाली. या टेम्पोखाली सापडण्यापूर्वीच नागरिकांनी आरडाओरड केल्याने दोन महिला बालंबाल बचावल्या. अखेर टेम्पोने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकींना धडक दिल्याने टेम्पो थांबला. ही घटना शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास सदर बझारमध्ये घडली.याबाबत अधिक माहिती अशी, एक गॅस वितरक सिलिंडरने भरलेला टेम्पो घेऊन सदर बझारमध्ये आला होता. रस्त्याच्याकडेला टेम्पो उभा करून तो एका घरामध्ये गॅस देण्यासाठी गेला होता. विशेष म्हणजे संबंधित चालकाने टेम्पो सुरूच ठेवला होता. मात्र, हण्डलॉक अचानक निघाल्याने टेम्पो विनाचालक रस्त्यावरून चाळीसच्या स्पीडने धाऊ लागला.
टेम्पोमध्ये चालक नसल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांच्या निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरड सुरू केल्यामुळे टेम्पोसमोरून चालत निघालेल्या दोन महिलांचे लक्ष पाठीमागून येणाऱ्या टेम्पोकडे गेले. त्यामुळे त्या महिला तत्काळ रस्त्यातून बाजूला झाल्या. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. लोकांनी आरडाओरड केली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. भरधाव आलेला टेम्पो रस्त्याच्याकडेला उभ्या केलेल्या चार दुचाकींवर जाऊन आदळला. त्यानंतर चालक धावत त्या ठिकाणी आला.