केशव जाधव ल्ल पुसेगावतब्बल पन्नास वर्षं आयुष्याच्या चढ-उतारात एकमेकाला साथ देत, स्वत:ची कर्तव्ये अन् जबाबदाऱ्या खंबीरपणे सांभाळत ज्यांनी संसाराची नौका पैलतीरी नेली अशा जोडप्यांनी पुन्हा बोहल्यावर चढत दुसऱ्यांदा त्याच सोहळ््याचा रोमांच अनुभवला. पुसेगाव (ता. खटाव) येथील माजी सैनिक संघटनेने हा अनोखा सोहळा साजरा करत माजी सैनिकांच्या आयुष्यात नवचैतन्याचा प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केला आहे. ना कसला डामडौल, ना आर्कषक मंडप, ना बँडबाजा. लगीनघाई नाही. हळदीचा थाटमाट नाही; पण अत्यंत भावपूर्ण वातावरणात हा विवाहसोहळा रंगला. ऐंशीव्या वर्षी नवरा बोहल्यावर चढतो काय, आपल्या पत्नीला ‘नको-नको’ म्हणतानाही पुन्हा एकदा वरमाला घालून पेढा भरवतो काय अन् नवदाम्पत्याप्रमाणं लाजत दोघेही उखाणे घेतात काय... सेवागिरी मंदिरात रंगलेल्या विवाहसोहळ्यातील हे चित्र. यानिमित्तानं चांगल्या-वाईट अनुभवांचे गाठोडे उराशी घेऊन एकत्र व्यतीत केलेल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या आठवणींना उजाळा मिळाला. गतानुभवांच्या आठवणींना पाझर फुटला अन् त्याचवेळी वऱ्हाडी मंडळींनी अक्षतांचा वर्षाव नवदाम्पत्यांवर केला. येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीने पुसेगाव व परिसरातील ज्या माजी सैनिकांनी आपल्या सहचारिणीबरोबर लग्नाची ५० वर्षे पूर्ण केली आहेत व ज्यांच्या वयाची ८० वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा माजी सैनिकांचा विवाह सोहळा आयोजित केला होता. यावेळी माजी सैनिक भानुदास जाधव, शिवाजी जाधव, रामचंद्र जाधव, पुरूषोत्तम कुलकर्णी, सिद्राम जाधव, रामदास साळुंखे, प्रल्हाद मखरे हे पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकले. तसेच ज्यांच्या अर्धांगिनी हयात नाहीत अशा नारायण जाधव, महादेव जाधव या वयोवृध्द माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या संघटनेचे अध्यक्ष माजी कॅप्टन बजरंग देवकर, सचिव बाबूराव जाधव, अरविंंद देशमुख उपस्थित होते. आता घरटे नाही सोडायचे...माजी सैनिकांनी अत्यंत खडतर व हालाखीच्या परिस्थितीत कुटुंबापासून दूर आपले जीवन व्यतीत केले आहे. उतारवयात त्यांना एकटेपणाची जाणीव होऊ नये म्हणून या संघटनेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात. उतारवयात त्यांचे आयुष्यात आनंदाने भरून जावे, यासाठी या विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दर वर्षी जुलै महिन्यात अशा सोहळ्याचे आयोजन करणार असल्याचे अध्यक्ष बजरंग देवकर यांनी नमूद केले.
वयोवृद्ध सात जवान चढले पुन्हा एकदा बोहल्यावर !
By admin | Published: July 10, 2014 12:26 AM