ढेबेवाडी : येथील भर बाजारपेठेत चोरट्यांनी शनिवारी रात्री धुमाकूळ घालत सात दुकाने फोडली. यामध्ये दोन दुकानांतील सुमारे ९० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. अन्य पाच दुकानांत चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.ढेबेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढेबेवाडी येथील बसस्थानक परिसरात सणबूर रस्त्याच्या बाजूला व्यापारी संकुलाच्या इमारतीत दुकानगाळे आहेत. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी यातील सात दुकानांचे शटर लोखंडी कटावणीसारख्या हत्याराने उचकटून फोडली. यामध्ये राजस्थान स्वीटस या मिठाईच्या दुकानातील लाकडी ड्रॉवरमधील ७० हजारांची रोकड चोरट्यांच्या हाती लागली, तर सोनल क्लॉथ सेंटरमधील १० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. जानुगडे कृषी सेवा केंद्र व मोरया मेडिकल ही दुकाने फोडली; परंतु चोरट्यांच्या हाती काही लागले नाही, तर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील अनू ज्वेलर्स, समर्थ कृपा मोबाईल शॉपी, दत्त भेळ सेंटर या तिन्ही दुकानांची शटर्स चोरट्यांनी फोडली. यामध्ये अनू ज्वेलर्स या दुकानाचे पहिले शटर फोडण्यात आले; परंतु आत असणाºया दुसºया जाळीच्या शटरमुळे चोरट्यांना ज्वेलरी शॉपमध्ये प्रवेश करता आला नाही, तर मोबाईल शॉपीतही मोबाईल किंवा रक्कम हाती लागली नाही. केवळ मोबाईलची रिकामी पाकिटे होती, तर भेळ सेंटरमध्येही काही मिळाले नाही.या घटनेनंतर सकाळी साडेचारच्या सुमारास आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी ही बाब ढेबेवाडी पोलिसांना कळविली. ढेबेवाडीचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा केला.
ढेबेवाडीत रात्रीत सात दुकाने फोडली; ९० हजार रुपये लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 12:03 AM