सातारा : ‘वाई तालुक्यातील गुळुंब येथील अंगणवाडी सेविका सुनीता यादव (वय ४१) यांचा पोळने घातपात केल्याची शक्यता असून, पोलिसांनी त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी,’ अशी मागणी महाराष्ट्र पूर्व प्राथमिक सेविका संघाचे महासचिव शौकतभाई पठाण यांनी केली आहे.शौकतभाई पठाण यांनी दिलेली माहिती अशी की, सुनीता यादव या गुळुंब येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. मात्र, त्यांना किडनीचा आजार झाल्याचे सांगून वाई येथील घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून संतोष पोळने रुग्णवाहिकेतून सुनीता यादव यांना मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये नेले होते. या ठिकाणी दि. २६ जानेवारी २०१६ रोजी सुनीता यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह गावी आणण्यात आला. मात्र, संतोष पोळने एकापाठोपाठ सहा खून केल्याचे समोर आल्यानंतर सुनीता यादव यांचाही त्याने अशाच पद्धतीने घातपात केल्याची शक्यता आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना यासंदर्भात सखोल चौकशीचे निवदेन देणार असल्याचेही पठाण यांनी सांगितले.संतोष पोळ हा सध्या पोलिस कोठडीत आहे. पोलिसांना तो म्हणावातसे सहकार्य करत नाही. परंतु पोलिसांनी सुनीता यादव यांच्या मृत्यूबाबत पोळकडे कसून चौकशी केल्यास नक्कीच त्याच्याकडून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतील, अशी अपेक्षाही अंगणवाडी सेविकेंनीही ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.येत्या दोन दिवसांत पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना निवेदन देण्यात येणार असून सुनीता यादव यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)सुनीता यादव यांच्या कुटुंबावर दबाव!सुनीता यादव यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. त्यांचा शवविच्छेदन अहवालही गुलदस्त्यात आहे. सुनीता यादव यांना आठ आणि बारा वर्षांचा मुलगा आहे. या दोघांवरही प्रचंड दबाव असून, त्यांना तक्रार देण्यापासून परावृत्त केले जात असल्याचा आरोपही शौकत पठाण यांनी केला आहे.
पोळवर सातव्या घातपाताचा आरोप! -- कोल्ड ब्लडेड सिरियल किलर!
By admin | Published: September 06, 2016 9:59 PM