सातारा : हॉटेलमध्ये झालेल्या वादानंतर हॉटेलचे व्यवस्थापक मनिंदर कृष्णदेव वाघमळे (रा. कण्हेर, ता. सातारा) यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सातजणांना सातारा तालुका पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.प्रतिक दीपक येवले, आकाश संपत बोतालजी, ऋषीकेश विजय बुधावले (सर्व रा. कोरेगाव) कुणाल विश्वास मोरे (रा. आंबेदरे ,ता.सातारा), प्रकाश सुनिल शिवदास (रा. संगम माहुली, सातारा) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, कण्हेर, ता. सातारा येथील हॉटेल साईसागरमध्ये गुरूवार, दि.९ रोजी रात्री संशयित युवक वाढदिवस साजरा करून जेवण करण्यासाठी तेथे गेले होते. त्यावेळी त्यांनी मोठ मोठ्याने ओरडण्यास सुरूवात केली. तसेच त्या युवकांनी वेटरला शिवीगाळ केली होती. ही बाब वेटरने व्यवस्थापक वाघमळे यांना सांगितली.त्यामुळे युवकांना गोंधळ करून नका, असे वाघमळे यांनी सांगितले.
यातील एकाने वाघमळे यांना जोराचा धक्का दिला. मात्र, नंतर वेटरच्या मदतीने त्यांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात आल्याने चिडलेल्या संशयितांनी वाघमळे यांना चाकूने भोकसण्याचा प्रयत्न केला. यात वाघमळे जखमी झाले होते. घटनेनंतर पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी तपास गतिमान करून गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
संबंधित युवकांची ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान होते. खबऱ्यामार्फत यातील एका युवकाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर एका-एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी केवळ चार दिवसांत जीवघेणा हल्ल्याचा छडा लावला. ही कारवाई पोलीस हवालदार दादा परिहार, राजेंद्र वंजारी, सुजीत भोसले, महेंद्र पाटोळे, सनी आवटे, सागर निकम, संदीप कुंभार, रमेश चव्हाण, नितीराज थोरात, विश्वनाथ आंब्राळे यांनी केली.