कऱ्हाड : शासकीय योजनांमधून प्रत्येकी एक लाख १० हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवत जिल्ह्यातील सुमारे एक हजार ६०० महिलांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये उकळून त्यांना तब्बल ४८ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. याबाबत काही महिलांनी पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांना भेटून तक्रारअर्ज त्यांच्याकडे सादर केला आहे.कऱ्हाडच्या पोलीस उपअधीक्षक कार्यालयात सोमवारी सायंकाळी शहरातील सुमारे शंभर महिला दाखल झाल्या. या महिलांनी उपअधीक्षक मितेश घट्टे यांची भेट घेऊन आपली फसवणूक झाल्याचे सांगितले. याबाबतचा तक्रारअर्जही त्यांनी उपअधीक्षक घट्टे यांना दिला. कासेगाव परिसरातील एक महिला फेब्रुवारी २०१४ मध्ये कऱ्हाडात आली होती. तिने घरकुलासाठी शासकीय योजनेतून प्रत्येकी एक लाख १० हजार रुपये मिळवून देते, असे आमिष दाखविले. त्यासाठी तिने प्रत्येक महिलेकडून तीन हजार रुपये उकळले. कऱ्हाडबरोबरच सातारा जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या व वाळवा तालुक्यातील महिलांकडूनही त्या महिलेने पैसे घेतले आहेत. त्या महिलेला पैसे देणाऱ्यांमध्ये कऱ्हाड शहरातील सातशे महिला आहेत. तीन हजार रुपये भरल्यानंतर तीन महिन्यांत घरकुलासाठी कर्ज मंजूर करून देऊ, असे संबंधित महिलेने पैसे भरणाऱ्यांना सांगितले होते. मात्र, चार महिने होऊनही कर्ज मंजूर न झाल्याने महिलांनी तिच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. काही दिवसांपूर्वी कऱ्हाडातील काही महिला वाळव्याला गेल्या. संबंधित महिलेचा शोध घेत तिला घेऊन सर्वजणी कऱ्हाड शहर पोलिसांत आल्या. मात्र, पोलिसांनी योग्य दखल घेतली नाही, असा आरोप महिलांनी केला आहे. फसवणूक झालेल्यांपैकी काही महिलांनी उपअधीक्षक मितेश घट्टे यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपले गाऱ्हाणे मांडले. याबाबत तत्काळ गुन्हा दाखल करण्याची सूचना उपअधीक्षक घट्टे यांनी शहर पोलिसांना दिली आहे. त्यानुसार प्रकरणाची चौकशी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात सुरू होते.शहर पोलिसांविषयी संतापकाही दिवसांपूर्वी फसवणूक करणाऱ्या महिलेला घेऊन आम्ही शहर पोलीस ठाण्यात गेलो होतो. मात्र, त्यावेळी पोलिसांनी आमची दखल घेतली नाही. त्या महिलेला कारवाई न करताच सोडून देण्यात आले. त्यामुळे ती महिला सध्या आम्हालाच धमकावत आहे. संशयित महिलेवर त्याचवेळी कारवाई झाली असती, तर आज ही वेळ आली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी उपअधीक्षक घट्टे यांच्यासमोर व्यक्त केली.
सोळाशे महिलांना गंडा
By admin | Published: February 02, 2015 10:49 PM