सातारा : मुलीने घेतलेले संसाराचे साहित्य मिळण्यासाठी सत्तरवर्षीय मातेची अद्यापही फरपट थांबली नसून, शाहूपुरी पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संबंधित मातेने केला आहे.ललिता प्रकाश मोरे (वय ७०, रा. भाटमरळी, ता. सातारा) असे मातेचे नाव आहे. ललिता मोरे यांचे स्वत:चं घर असतानाही त्यांच्या मुलाने त्यांना घरातून हाकलून दिले. त्यांचे संसारोपयोगी साहित्यही त्यांना दिले नाही. हे साहित्य त्यांच्या एका विवाहित मुलीने घेतले असल्याचे ललिता मोरे यांनी पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी संबंधित मुलीवर गुन्हा दाखल केला होता. ‘मला काही नको; पण माझे संसारपयोगी साहित्य मला परत मिळावे,’ अशी अपेक्षा मोरे यांनी व्यक्त केली होती. सुरुवातीला पोलिसांनी त्यांचे साहित्य देण्याचे मान्य केले होते. मात्र, नंतर माशी कुठे शिंकली, कुणालाच समजले नाही. शाहूपुरी पोलीस ठाण्यात रोज हेलपाटे मारून आजी ललिता मोरे हतबल झाल्या. माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणून मला न्याय मिळणार नाही, अशी त्यांची आता धारणा झाली आहे.ललिता मोरे यांना काही महिन्यांपूर्वी घरातून हाकलून दिल्यानंतर त्या नित्यनियमाने पोलीस मुख्यालयासमोरील एका बाकड्यावर बसत होत्या. तेथून ये-जा करणाऱ्या पोलिसांकडे हात पसरून त्या पैसे मागत होत्या. काही पोलीस त्यांना पैसे देत होते तर काही पोलीस त्यांच्याकडे कानाडोळा करत होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुगुटराव पाटील हे एके दिवशी पोलीस मुख्यालयात कामानिमित्त आले होते. यावेळी त्यांना आजीबाई पैसे मागताना दिसून आल्या. यावेळी त्यांनी आजीबार्इंना जेवण देऊन आपल्या गाडीतून पोलीस ठाण्यात नेले. या ठिकाणी आजीबाई ललिता मारे यांच्याकडून त्यांची आपबिती पाटील यांनी शांतपणे ऐकली. घरातून हाकलून देताना मुलीने संसाराचे साहित्य घेतले असल्याचे त्यांना सांगण्यात आले. पोलिसांनी संबंधित मुलीवर गुन्हाही दाखल केला.मुलीकडून आज साहित्य मिळेल, उद्या मिळेल, या आशेवर ललिता मोरे पोलीस ठाण्यात येरजºया मारत होत्या. मात्र, त्यांची निराशाच झाली. पोलीस आपल्याला दाद देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.गुन्हा दाखल पुढे काय झाले...ललिता मोरे यांना घरातून हाकलून दिल्यानंतर त्यांच्या मुलीने संसारोपयोगी साहित्य बळकावले. त्यामुळे पोलिसांनी संबंधित मुलीवर गुन्हा दाखल केला. अशा प्रकारच्या घटना समाजात दुर्मीळ घडत असतात. त्यामुळे या घटनेकडे अनेकांचे लक्ष होते. ललिता मोरे यांना न्याय मिळावा, यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनीही त्यांना सहानुभूती दर्शविली आहे. मुलीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय झाले, हे मोरे यांना अद्याप माहिती नाही. रोज सकाळी मोरे या पोलीस मुख्यालयाजवळ येत आहेत. तेथून ये-जा करणाºया पोलिसांकडे हात पसरून त्या मदत मागत आहेत. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या राहण्याची सोय केली होती. मात्र, त्यांनी त्यास नकार दिला आहे.
संसाराच्या साहित्यासाठी सत्तरवर्षीय मातेची फरपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:58 PM